भारताने बंदी घाल्यानंतर टीक-टॉकच्या सीईओंचे कर्मचाऱ्यांसाठी पत्र


नवी दिल्ली – भारत-चीन यांच्यात पुर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ५९ चिनी अॅपवर केंद्र सरकारने बंदी घातली असून या अॅपमध्ये टीक-टॉकचाही समावेश आहे. या बंदीनंतर भारतातील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी टीक-टॉकच्या सीईओंनी एक पत्र लिहिले आहे. आपल्या पत्रातून केविन मेयर यांनी कर्मचाऱ्यांना इंटरनेटचे लोकशाहीकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असून त्याला मोठ्या प्रमाणात यशही मिळाल्याचे म्हटले आहे. तसेच आपल्या संकल्पासाठी आपण कटिबद्द आणि वचनबद्द राहूया. आम्ही भागधारकांची चिंता दूर करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

भारतीय कायद्यानुसार टीक-टॉक सर्व डेटा गोपनीयता आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन करत असून आणि वापरकर्त्याची गोपनीयता आणि अखंडता यांना सर्वाधिक महत्त्व दिले जात असल्याचेही केविन यांनी पत्रातून सांगितले आहे. टीक-टॉकचे मुख्य कार्यकारी तसेच बाइटडान्सचे मुख्य ऑपरेशन अधिकारीदेखील केविन आहेत. त्यांनी ही पोस्ट कंपनीच्या वेबसाईटवर प्रसिद्द केली आहे. या पोस्टचे शिर्षक भारतीय कर्मचाऱ्यांसाठी संदेश असे असून भारतातील २० कोटी युजर्सना केविन यांनी आपला आनंद, क्रिएटीव्हिटी, अनुभव जगापर्यंत पोहोचवता यावेत, यासाठी आम्ही खूप मेहनत घेतल्याचे सांगितले आहे.

आमचे कर्मचारी आमची मोठी ताकद असून त्यांची काळजी आमची प्राथमिकता असल्याचे केविन यांनी सांगितले आहे. यावेळी आपल्या दोन हजार कर्मचाऱ्यांना अभिमान वाटेल असा सकारात्मक अनुभव आणि संधी अनुभवण्यासाठी जे काही लागेल ते करण्याचे आश्वासन केविन यांनी दिले आहे. यावेळी केविन यांनी पुन्हा एकदा डिजिटल इंडियामध्ये सक्रीय भाग नोंदवण्याकडे आपण लक्ष ठेवून असल्याचेही सांगितले आहे.

करोडो युजर्सना वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या कामाचा आनंद घेण्याची संधी टीक-टॉकने दिली. यामुळे अनेकांना कमाईची नवी संधी उपलब्ध झाली. आपल्यातील कलेचे प्रदर्शन जागतिक स्तरावर करताना अनेकांना फक्त फिल्म स्टार तसेच खेळाडूंसाठी उपलब्ध असणाऱ्या ब्रॅण्डचे प्रमोशन करण्याची संधी मिळाली. हे गाव खेड्यात राहणाऱ्या अनेक टीक-टॉक युजर्ससाठी सत्य असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment