लालबागच्या राजाचा “यंदा गणेशोत्सव नव्हे तर आरोग्योत्सव”


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांशी एक बैठक घेतली होती त्यावेळी मुंबईमधील अनेक गणेशोत्सव मंडळांनी लहान आकाराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या सर्वांमध्ये लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ अपवाद ठरत मंडळाने यंदा गणेशोत्सवासंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात माहिती देताना लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद् सचिव सुधीर साळवी यांनी याबद्दल पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा न करता आरोग्योत्सव साजरा करण्यावर मंडळाच्या ऑनलाईन बैठकीत एकमत झाले आहे. यंदा राजाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार नाही. लालबागच्या राजाच्या मूर्तीची स्थापनाच होणार नसल्यामुळे यंदा लालबागचा राजाच्या दर्शनाला कोट्यावधी भाविकांना मुकावे लागणार आहे.

11 दिवस गणपती बाप्पाची मूर्ती न बसवता या 11 दिवसांमध्ये रक्तदान शिबिरे तसेच प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायत्ता निधीत 25 लाखांचा निधी जमा करणार असल्याची माहिती साळवी यांनी दिली. तसेच या कोरोनाकाळात शहिद झालेल्या कोरोना योद्धा आणि पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचा या 11 दिवसांच्या कालावधीत मंडळातर्फे सन्मान करण्यात येणार आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा सध्या झपाट्याने वाढत आहे. अवघ्या काही महिन्यांवर गणेशोत्सव असतानाच राज्यासमोर असणारे कोरोनाचे संकट लक्षात घेता मंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनला येतात. ही गर्दी कोरोनाच्या काळात टाळण्यासाठी मंडळाने यंदा मूर्ती न बसवण्याचा निर्णय घेतल्याचे साळवी यांनी सांगितले आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर आधीच बराच ताण आहे. त्यात गणेशोत्सवामुळे होणाऱ्या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग होऊ नये या दृष्टीने खबरदारी म्हणून मंडळानेच पुढाकार घेत हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या काळामध्ये राज्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी बृह्नमुंबई महानगरपालिका आणि केईएम रुग्णालयाच्या मदतीने रक्तदान आणि प्लाझमा थेरपी उपक्रम मंडळामार्फत राबवण्यात येणार आहे.

नवसाला पावणारा म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या लालबागच्या राजाला ८६ वर्षांची पंरपरा आहे. मागील ८६ वर्षांपासून लालबागमधील मार्केटमध्ये राजाची मूर्ती विराजमान होते. अनेक वर्षांपासून राजाची १४ फुट उंचीच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आवर्जून येतात. पण यंदा कोरोनामुळे उत्सवाऐवजी रक्तदान शिबिर आणि प्लाझ्मा थेरपी शिबिर राबवण्यात येणार आहेत. दरवर्षी लालबागच्या राजाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा अगदी साध्यापद्धतीने आणि समाज भान राखत मंडळाने उत्सव साजरा न करण्याला प्राधान्य दिले आहे.

Leave a Comment