वैष्णवांविना यंदा आषाढीचा सोहळा! मुख्यमंत्र्यांसह विणेकरी विठ्ठल बडेंना पूजेचा मान


पंढरपूर : यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक आषाढीच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईची महापूजा केली. यावेळी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. यंदा मानाचा वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मान मिळाला.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. हा मान मला मिळेल असे स्वप्नातही वाटत नव्हते. अशी पूजा करावी लागेल, असेही कधी वाटले नव्हते. माऊलीला मी साकडे घातले आहे. आता आम्हाला चमत्कार दाखव, मानवाने या रोगापुढे हात टेकले आहेत. आपल्याकडे काही औषध नाही. असे तोंडाला पट्टी घालून केव्हापर्यंत जगायचे. संपूर्ण आयुष्य अडकून गेले आहे. आजपासून, या आषाढीपासून आम्हाला या कोरोनाच्या संकटातून बाहेर काढ. संपूर्ण जगाला पुन्हा आनंदी, मोकळे जीवन जगायला मिळू दे, असे साकडे घातल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


आषाढी यात्रेनिमित्त भाविकांना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पंढरपुरात येण्यास बंदी असल्यामुळे यंदा विठ्ठलाची दर्शन रांग रिकामी आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर 30 जूनपासून पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपूर शहर आणि त्याच्या दहा किलोमीटर परिसरात 30 जूनपासून दोन जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. सर्वसामान्य नागरिकांनी आणि वारकऱ्यांनी या कालावधीत पंढरपुरात येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment