भारतीयांना हिणवणाऱ्या चिनी वर्तमानपत्राच्या संपादकाला आनंद महिंद्रांचे सणसणीत उत्तर


नवी दिल्ली – भारत सरकारने सोमवारी संध्याकाळी देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत असल्याच्या आधारे टीक-टॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली. त्यातच सोशल मीडियावर भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये हा विषय चर्चेत असताना चीनच्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राचे संपादक हू शिजिन यांनी काल भारतीयांना टोमणा मारला. त्यावर त्यांना सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्र यांनी सणसणीत उत्तर दिले आहे.


हू शिजिन यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन भारतीय वस्तूंना चीनच्या लोकांनी बॅन करायचे ठरवले तरी ते करु शकत नाहीत, कारण आमच्याकडे भारतीय वस्तू खूप कमी आहेत, अशा आशयाचे ट्विट केले आहे. त्याचबरोबर भारतीय मित्रांनो तुमच्याकडे राष्ट्रवादापेक्षा महत्त्वाचे काहीतरी असायला हवे, असेही आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे.

भारतीयांना हिणवणाऱ्या या ट्विटवर आनंद महिंद्रांचे लक्ष गेले आणि शिजिन यांच्या त्या ट्विटला त्यांनी रिट्विट करत प्रत्युत्तर दिले. भारतीय कंपन्यांसाठी ही टिप्पणी कदाचित सर्वात प्रभावी आणि प्रेरक असेल, चिथावल्याबद्दल तुमचे आभार, असे म्हणत महिंद्रा यांनी, तुमचे आव्हान आम्ही स्वीकारले, अशा आशयाचे ट्विट केले आहे. दरम्यान आनंद महिद्रांनी दिलेले उत्तर भारतीय नेटकऱ्यांच्या चांगलंच पसंतीस उतरले असून ते ६६ हजारांहून अधिक जणांनी आतापर्यंत लाइक केले आहे. त्यावर नेटकरी आपल्या भरभरुन विविध प्रतिक्रियाही देत आहेत.

Leave a Comment