लालबागचा राजा मंडळाचा कौतुकास्पद निर्णय – मुख्यमंत्री


मुंबई – राज्यावर कोरोनाचे ओढावलेले सावट अजूनच गडद होत असताना मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ऐतिहासिक आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. यंदाची वर्षी गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा न करता सलग 11 दिवस गणेशोत्सवा ऐवजी आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे. त्यांनी याबाबत ट्विट करून मंडळाचे अभिनंदन केले आहे. राज्याच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याला या निर्णयामुळे बळ मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.


आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री म्हणतात, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव साजरा न करता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. लालबागच्या राजाने जनतेसाठी नेहमीच आदर्श ठेवला आहे. या निर्णयाने राज्याच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ मिळणार आहे.

दरम्यान मंडळातर्फे आज सकाळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मंडळाचे मानद् सचिव सुधीर साळवी यांनी कोरोना विरोधातील लढ्यात जे पोलीस शिपाई आणि अधिकारी शहीद झाले आहेत त्यांच्या कुटुंबांचा सन्मान मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाच्या कालावधीत केला जाणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 लाख रुपये देण्याची घोषणाही मंडळाने केली आहे.

Leave a Comment