
मुंबई – राज्यातील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधत गोरगरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी ‘शिवभोजन’ योजनेची अंमलबजावणी सुरु केली. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २६ जानेवारी २०२० पासून आतापर्यंत १ कोटी ८७० थाळ्यांचे वितरण करण्यात आल्याची माहिती दिली. त्याचबरोबर राज्यातील गरीब जनतेला या योजनेने मोठा दिलासा दिला असून ही योजना त्यांच्यासाठी वरदान ठरत असल्याचेही ते म्हणाले.
गरीबांसाठी वरदान ठरत आहे ‘शिवभोजन’ योजना;आतापर्यंत एक कोटींपेक्षा अधिक लोकांना लाभ
शिवभोजन योजनेअंतर्गत राज्यात ८४८ केंद्रे कार्यरत आहेत. दरम्यान, या योजनेचा विस्तार करून ही योजना तालुकास्तरापर्यंत राबविण्यास सुरूवात झाली आहे. जानेवारी महिन्यात ७९ हजार ९१८, फेब्रुवारी महिन्यात ४ लाख ६७ हजार ८६९, मार्च महिन्यात ५ लाख ७८ हजार ०३१, एप्रिल महिन्यात २४ लाख ९९ हजार २५७, मे महिन्यात ३३ लाख ८४ हजार ०४० आणि जुन महिन्यात २९ जून पर्यंत २९ लाख ९१ हजार ७५५ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने या अडचणीच्या काळात अतिशय सुयोग्य पद्धतीने योजनेचे सनियंत्रण आणि व्यवस्थापन केल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागाच्या सर्व कर्मचारी-अधिकारी वर्गाचे, शिवभोजन केंद्राच्या चालकांचे कौतूक केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन केंद्र चालकांनादेखील स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करून घेणे, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
