पंतप्रधानांचा देशाशी संवाद; नोव्हेंबरपर्यंत 80 कोटी लोकांना मोफत धान्य देणार


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला सलग सहाव्यांदा देशाला संबोधित केले आहे. त्यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अनलॉक २ ची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर आपण कोरोनाशी लढताना आता अनलॉक २ मध्ये प्रवेश करतो आहोत. अशात पावसाळा आला आहे तेव्हा स्वतःची काळजी घेण्याचे आवाहनही नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

देशात वेळेवर केलेल्या लॉकडाउन आणि इतर महत्त्वाचे निर्णयांमुळे आपल्याकडील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहिला. अनलॉक १ मध्ये काही प्रमाणात निष्काळजीपणा वाढताना पाहण्यास मिळाला. यावर मोदींनी नाराजी व्यक्त केली. तसेच लॉकडाउन सुरु झाल्यानंतर अत्यंत गांभीर्याने नियमांचे पालन करण्यात आले. आता पुन्हा एकदा राज्य सरकारांना, देशाच्या नागरिकांना आणि संस्थांना अशाच प्रकारची सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

कंटेटमेन्ट झोनची आपल्याला खास करुन विशेष काळजी घ्यायची आहे. नियम न पाळणाऱ्या लोकांना आपल्याला रोखावे लागेल आणि नियमांचे महत्त्व त्यांना समजावून लागेल, असेही मोदींनी म्हटले आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील परिस्थिती नियंत्रणात आहे. पण आता अनलॉक २ सुरु करताना आपल्याला अधिक काळजी घ्यायची आहे. निष्काळजीपणा करु नका असेही त्यांनी सांगितले आहे.

लॉकडाऊनच्या संकटाशी निपटण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजना लागू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत गरिबांना पावणे दोन लाख कोटींचे पॅकेज दिले गेले. गेल्या तीन महिन्यांत जन धन खात्यांत ३१ हजार कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती नरेंद्र मोदींनी यावेळी दिली. तसेच ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती देखील मोदींनी दिली.

३० नोव्हेंबरपर्यंत गरीबांना धान्य मोफत दिले जाणार आहे अशी अत्यंत महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. याचा लाभ देशातील ८० कोटी जनतेला होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही लवकरच लागू केली जाणार असल्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. जे करदाते आहेत त्यांना मी अभिवादन करतो त्यांनी प्रामाणिकपणे त्यांचा कर भरला त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो असेही मोदींनी म्हटले आहे.

दरम्यान तत्पूर्वी यावेळी पंतप्रधान नेमके काय बोलणार याकडेच सगळ्याचे लक्ष लागून राहिले होते. पतंप्रधान आज काही विशेष घोषणा करणार करणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्याचबरोबर देशात सध्या कोरोना आणि चीन सीमेवरील तणावाची परिस्थिती यावरुन पंतप्रधान काय भाष्य करणार याकडे देखील देशातील जनतेचे लक्ष लागून राहिले होते.

Leave a Comment