ताज हॉटेलला दहशतवादी हल्ल्याची धमकी, पाकिस्तानवरून आला होता फोन

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. प्रसिद्ध ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा फोन आला होता. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हा फोन पाकिस्तानमधून आला होता. फोन करणारा अज्ञात व्यक्ती म्हणाला की, कराचीच्या स्टॉक एक्सचेंजवर झालेला दहशतवादी हल्ला संपुर्ण जगाने बघितला. आता भारताच्या ताज हॉटेलवर 26/11 सारखा हल्ला पुन्हा एकदा होईल. या संदर्भात न्यूज18 ने वृत्त दिले आहे.

न्यूज18 च्या वृत्तानुसार, ताज हॉटेलला पाकिस्तानवरून आलेल्या धमकीच्या फोनची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. या फोननंतर मुंबईतील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. काल रात्री आलेल्या या फोननंतर मुंबई पोलीस आणि हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुरक्षेची पाहणी केली. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती जमा केली जात आहे. सोबतच दक्षिण मुंबईत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे.

2008 साली झालेल्या मुंबईत हल्ल्याच्या वेळी देखील दहशतवाद्यांनी ताज हॉटेलला लक्ष्य केले होते. या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्यांसह शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

Leave a Comment