मुंबई पोलीस In Action Mode; विनाकारण प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना दणका


मुंबई – सोमवारी सकाळी मुंबईतील विविध भागांमध्ये मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. मुंबईच्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्याचबरोबर मुंबईतील वाहतूक गोगलगायीच्या गतीने सुरु होती. त्यामुळे कामावर निघालेल्या नोकरदारांचे प्रचंड हाल झाले. काल मुंबईत ही वाहतूक कोंडी पोलिसांनी सुरु केलेल्या तपासणी नाक्यांमुळे झाली होती.

पोलिसांनी या तपासणी दरम्यान एकाचदिवसात तब्बल १६ हजार वाहने जप्त केली. आपण बाहेर का निघालो आहे? त्याचे कुठलेही ठोस कारण या वाहन चालकांना पटवून देता न आल्यामुळे या १६ हजार वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. रविवारच्या तुलनेत सोमवारी दुप्पट वाहन चालकांवर कारवाई करण्यात आल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना नव्या निर्देशानुसार, ऑफिस आणि अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घरापासून दोन किलोमीटरच्या परिघाबाहेर विनाकारण प्रवास करताना आढळल्यास कारवाई करण्याचे संकेत दिले होते. पोलिसांनी सोमवारी कोणालाही सोडले नाही. कोणी रक्त चाचणीसाठी, किराणा सामान आणण्यासाठी किंवा बीपीओमध्ये कामावर जाण्यासाठी निघाले असले, तरी त्यांची वाहन तपासणी केली. जवळपास ३८ हजार गाडयांची तपासणी करण्यात आली.

सकाळी ९.३० च्या सुमारास दहीसर आणि मुलुंड चेकनाका या मुंबईच्या प्रवेशाच्या आणि एक्झिट पॉईंटवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहनचालकांना थोडेस अंतर कापण्यासाठी सुद्धा अर्धा ते एक तास थांबून रहावे लागत होते. दुचाकीस्वार पोलिसांच्या या तपासणी मोहिमेत सोपे लक्ष्य ठरले. पोलिसांनी जप्त केलेल्या एकूण गाडयांपैकी ७२ टक्के दुचाकी आहेत. पोलिसांच्या या कारवाईवर दुचाकीस्वारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Comment