कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतरही लावून दिले लग्न; लग्नानंतर दोनच दिवसांत वराचा मृत्यू


पाटणा- देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले असतानाच बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एक विवाह सोहळ्यास हजेरी लावणाऱ्यांपैकी ९५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी वराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पाटण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या पालिगंज या ठिकाणी घडली. १५ जून रोजी पार पडलेल्या एका विवाह सोहळ्यात सामील झालेल्यांपैकी ९५ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ८० जणांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरूग्राममध्ये ३० वर्षीय वर हा सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. तसेच तो १२ मे रोजी आपल्या गावी पाटण्यात स्वतःच्या लग्नकार्यासाठी आला होता. याचदरम्यान, त्याच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आली. परंतु कुटुंबीयांनी त्याची चाचणी करण्याऐवजी त्याचे लग्न लावून दिले. वराची प्रकृती लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी बिघडली आणि त्याला पाटण्यातील एम्स रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची जिल्हा प्रशासनाला माहिती मिळताच त्याच्या लग्नसमारंभात सहभागी झालेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर सुरूवातीला १५ जणांचे कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर उर्वरित ८० जणांचेही कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. दरम्यान, वधूचीही कोरोना चाचणी करण्यात आली असून सुदैवाने तिचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. दरम्यान, या लग्नकार्यादरम्यान कोरोना संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. लग्नकार्यात ५० लोकांना सहभागी होण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली होती. परंतु या लग्नकार्यात गावातील शेकडो लोक सहभागी झाले होते.

Leave a Comment