या भारतीय कंपन्यांमध्ये आहे चीनची तब्बल 32 हजार कोटींची गुंतवणूक

भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. चीनी कंपन्यांच्या 59 अ‍ॅप्सवर सरकारने आता बंदी घातली आहे. मात्र अनेक भारतीय स्टार्टअप्समध्ये चीनी कंपन्यांची कोट्यावधींची गुंतवणूक आहे. डेटा आणि एनालिटिक्स फर्म ग्लोबलडेटानुसार, मागील 4 वर्षात भारतीय स्टार्टअप्समध्ये चीनची गुंतवणूक 12 पटीने वाढली आहे. 2016 मध्ये या स्टार्टअप्समध्ये चीनी कंपन्यांची गुंतवणूक 381 मिलियन अमेरिकन डॉलर (जवळपास 2800 कोटी रुपये) होती. जी 2019 मध्ये वाढून 4.6 बिलियन डॉलर्स (जवळपास 32 हजार कोटी रुपये) झाली आहे. या संदर्भात न्यूज18 ने वृत्त दिले आहे.

स्नॅपडील, स्विगी, उडान, झोमॅटो, बिग बास्केट, बायजू, डेलहीवेरी, फ्लिपकार्ट, हाइक, मेकमायट्रिप, ओला, ओयो, पेटीएम, पेटीएम मॉल, पॉलिसी बाजार इत्यादी कंपन्यांमध्ये चीनची गुंतवणूक आहे. ग्लोबलडेटानुसार, भारतातील प्रमूख 24 स्टार्टअप्समधील 17 स्टार्टअपमध्ये अलिबाबा आणि टेंसेंट सारख्या कंपन्या कॉर्पोरेट गुंतवणूक करत आहे. अलिबाबा व त्यांच्या इतर कंपन्यांनी पेटीएम, स्नॅपडील, बिगबास्केट आणि झोमॅटोमध्ये 2.6 बिलियन डॉलर्स लावले आहेत. तर ओला, स्विगी, हाइक, ड्रीम11 आणि बायजूमध्ये टेंसेंटने 2.4 बिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे. या स्टार्टअप्सचे सध्याचे बाजार मुल्य एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे.

ग्लोबलडेटाचे प्रमुख तंत्रज्ञान विश्लेषक किरण राज यांच्यानुसार, मागील काही वर्षात चीनसोबत तणाव नसल्याने चीनने भारतीय बाजारात कमी वेळेत वृद्धी केली. भारतीय टेक स्टार्टअप्समध्ये मोठी गुंतवणूक केली व हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला.

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, देशातील स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या अन्य प्रमुख चिनी गुंतवणूकदारांमध्ये मेटुआन-डाइनपिंग, दिदी चुक्सिंग, फोसुन, शुनवेई कॅपिटल, हिलहाऊस कॅपिटल ग्रुप आणि चीन-यूरेशिया इकॉनॉमिक को-ऑपरेशन फंड यांचा समावेश आहे.

Leave a Comment