राज्य स्तरावर 8 सुवर्णपदक जिंकणाऱ्या महिला अ‍ॅथलिटवर आली भाजी विकण्याची वेळ

झारखंडच्या महिला अ‍ॅथलिट गीता कुमारीने चालण्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण 8 सुवर्णपदक पटकावले आहेत. तिने कोलकत्ता येथील स्पर्धेत एक कास्य आणि एक रौप्य पदक देखील पटकावले आहेत. मात्र आता गीता कुमारीला आर्थिक अडचणीमुळे रामगड जिल्ह्यातील रस्त्यांवर भाजी विकावी लागत आहे.

झारखंड राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना याची माहिती मिळताच त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. गीताला रामगढ जिल्हा प्रशासनाने 50 हजार रुपये आणि अ‍ॅथलेटिक करियरसाठी दर महिन्याला 3 हजार रुपयांची मदत केली आहे. आर्थिक अडचणीमुळे गीताला रस्त्याच्या कडेला भाजी विकावी लागत असल्याची माहिती सोरेन यांना ट्विटरच्या माध्यमातून मिळाली. यानंतर त्यांनी रामगढ जिल्ह्याच्या उपायुक्तांना गीता कुमारी यांनी आर्थिक मदत करण्याचे निर्देश दिले.

रामगढचे उपायुक्त संदीप सिंह यांनी गीताला 50 हजार रुपयांचा चेक व प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी गीताला पुढील भविष्यासाठी देखील शुभेच्छा दिल्या.

गीताच्या चुलत भावाने सांगितले की, ती भाजी विकते सोबतच, हजारीबाग जिल्ह्यातील आनंद कॉलेजमध्ये बीएच्या अंतिम वर्षात शिकत आहे. तिचे कुटुंब आर्थिकरित्या कमजोर आहे. मात्र आता प्रशासनाकडून मदत मिळाल्याने ती खूष आहे.

Leave a Comment