अ‍ॅपल आणि गुगलने सरकारच्या आदेशानंतर आपल्या अ‍ॅप स्टोअरवरुन हटवले टीक-टॉक


नवी दिल्ली – भारत सरकारने सोमवारी संध्याकाळी देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत असल्याच्या आधारे टीक-टॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली. सरकारच्या आदेशानंतर काही तासांच्या आतच भारतातील गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरुन हटवले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील माहिती दिली आहे. पण अ‍ॅपल आणि गुगलने या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तरी हे अ‍ॅप या दोन्ही महत्वाच्या प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यात आले आहे.


टीक-टॉक अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअर तसेच गुगल प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले आहे. काल संध्याकाळी ५९ अ‍ॅप्सवर भारत सरकारने बंदी घातली. भारताच्या एकात्मतेला आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहचवणारी ही अ‍ॅप्स असून देशाच्या सुरक्षेसाठी आणि सुव्यवस्थेसाठी या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात येत असल्याचे सरकारने म्हटल्याचे ट्विट एएनआयने केले आहे. त्यामुळे आता युझर्सला टीक-टॉक अ‍ॅप नव्याने डाउनलोड करता येणार नाहीत.

दरम्यान भारतीय वापरकर्त्यांची माहिती अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालींवर प्रचलित असलेल्या या अ‍ॅपकडून बेकायदा साठवून भारताबाहेरील सव्‍‌र्हरना पुरवली जात असल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून करण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

Leave a Comment