‘टीक-टॉक’वरील बंदीनंतर दर तासाला एकाच वेळेस लाखोच्या संख्येत डाउनलोड होत आहे ‘चिंगारी’


नवी दिल्ली – केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयानं माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69 अ अंतर्गत देशाचे सार्वभौमत्व व एकात्मता, देशाची सुरक्षा आणि देशातील जनतेचे हित लक्षात घेत 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय काल संध्याकाळी घेतल्यानंतर चिनी अ‍ॅप टीक-टॉकला टक्कर देणाऱ्या मेड इन इंडिया अ‍ॅप चिंगारीची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. त्यातच चिंगारी अ‍ॅप डाउनलोड करणाऱ्यांमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे.

दर तासाला एक लाख वेळेस चिंगारी अ‍ॅप डाउनलोड होत असल्याची माहिती चिंगारीचे को-फाउंडर आणि चीफ प्रोडक्ट ऑफिसर सुमित घोष यांनी दिली आहे. चिंगारी अ‍ॅपचे सर्व्हर अचानक डाउनलोडिंगमध्ये वाढ झाल्याने डाऊन झाले होते, त्यानंतर घोष यांनी लोकांना थोडा धीर ठेवा अशी विनंती ट्विटरद्वारे केली.


गेल्या काही दिवसांपासून शॉर्ट व्हिडिओ मेकिंग सेगमेंटमधील आघाडीच्या टीक-टॉक या चिनी अ‍ॅपला पर्याय म्हणून ‘चिंगारी’ अ‍ॅप चांगलेच लोकप्रिय ठरत आहे. टीक-टॉकला भारतीय पर्याय असलेले हे अ‍ॅप छत्तीसगडचे आयटी प्रोफेशनल्स आणि ओडिशा व कर्नाटकच्या डेव्हलपर्सनी बनवले आहे. जवळपास दोन वर्षांचा कालावधी हे अ‍ॅप बनवण्यासाठी लागला. खास भारतीय युजर्सच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊ हे अ‍ॅप डिझाइन करण्यात आल्याचे भिलाईमधील रहिवासी आणि चिंगारी अ‍ॅपचे चीफ ऑफ प्रोडक्ट सुमित घोष यांनी यापूर्वी सांगितले होते.

नोव्हेंबर 2018 मध्ये गुगल प्ले स्टोअरवर चिंगारी अ‍ॅप अधिकृतपणे आले होते. पण भारतात काही दिवसांपासून चिनी सामानांचा बहिष्कार करण्याची मागणी जोर धरु लागल्यानंतर चिंगारीच्या डाउनलोडिंगमध्ये मोठी वाढ झाली. त्याचबरोबर आता प्ले स्टोअरमध्ये फ्री अ‍ॅप्सच्या टॉप चार्टमध्ये या अ‍ॅपने जागा मिळवली आहे.

Leave a Comment