आमिर खानच्या घरात कोरोनाचा शिरकाव, आईची चाचणी अद्याप बाकी

करण जोहर आणि बोनी कपूर यांच्यानंतर आता अभिनेता आमिर खानच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. आमिरने स्वतः सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. घरातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे आमिरने सांगितले. यानंतर कुटुंबाची चाचणी केली असता, त्यांचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले आहेत. मात्र त्याच्या आईची चाचणी अजून बाकी आहे.

आमिरने सोशल मीडिया पोस्टद्वारे त्वरित पावले उचलल्याबद्दल बीएमसीचे देखील आभार मानले. त्याने लिहिले की, माझ्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना त्वरित क्वारंटाईन करण्यात आले असून, बीएमसी अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत त्यांना आरोग्य सुविधेपर्यंत नेले. योग्यप्रकारे काळजी घेतल्याबद्दल मी बीएमसीचे आभार मानतो. बाकीच्या लोकांची देखील चाचणी करण्यात आली असून, रिपोर्ट नेगेटिव्ह आले आहेत. आता मी आईला चाचणी करण्यासाठी घेऊन जात आहे. तिचा रिपोर्ट नेगेटिव्ह यावा यासाठी प्रार्थना करा.

शेवटी आमिरने लिहिले की, मी कोकिलाबेन हॉस्पिटलचे डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानतो. चाचणीच्या प्रक्रियेत त्यांनी विशेष काळजी घेतली.

 

Loading RSS Feed

Leave a Comment