पाकिस्तानच्या स्टॉक एक्सचेंजवर दहशतवादी हल्ला - Majha Paper

पाकिस्तानच्या स्टॉक एक्सचेंजवर दहशतवादी हल्ला

पाकिस्तानच्या कराची शहरातील स्टॉक एक्सचेंजवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनुसार 4 बंदुकधारी दहशतवाद्यांनी स्टॉक एक्सचेंजवर हल्ला केला होता व या चारही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या दहशतवाद्यांनी शस्त्र-साठा घेऊन बिल्डिंगमध्ये प्रवेश केला होता. ही बिल्डिंग कराचीच्या हाय-सिक्युरिटी झोनमध्ये येते. अनेक खाजगी बँकांचे हेड ऑफिस देखील याच बिल्डिंगमध्ये आहे.

एनडीटिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हे चारही दहशतवादी सोनेरी रंगाचे कोरोला कारमधून आले होते. या चारही दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

हल्ल्याची सुचना मिळताच पाकिस्तान रेंजर्सचे जवान घटनास्थळी दाखल झाले. सिंध रेजंर्सने या चारही दहशतवाद्यांचा खात्मा झाला असल्याचे सांगितले आहे. हे दहशतवादी सकाळी 9 वाजता बिल्डिंगमध्ये घुसले व त्यांना अंधाधुंद गोळीबार सुरू केला. पाकिस्तानी रेंजर्स आणि सिंध पोलिसांच्या जवानांनी बिल्डिंगमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले असून, जवान पुर्ण बिल्डिंगची तपासणी करत आहेत. बिल्डिंगच्या आजुबाजूचा सर्व भाग सील करण्यात आला आहे.

जखमी झालेल्यांची स्थिती गंभीर असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृतांचा अचूक आकडा अद्याप समोर आलेला नाही.

Leave a Comment