प्रवीण दरेकरांनी इंधन दरवाढीचे खापर फोडले राज्य सरकारवर


सिंधुदुर्ग : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये असलेला आपला देश आता हळूहळू अनलॉक होण्यास सुरुवात झाली आहे. पण याच दरम्यान मागील काही काळापासून थांबलेली इंधन दरवाढ आता पुन्हा एकदा वाढू लागली आहे. या दरवाढीचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहे. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीला राज्य सरकार जबाबदार असल्याचा दावा केला आहे.

सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर प्रवीण दरेकर असून पत्रकारांशी यावेळी बोलत असताना राज्यातील पेट्रोल डिझेल दरवाढीवरचे खापर त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर फोडले आहे. पेट्रोल कंपन्या इंधन दरवाढीचा निर्णय हा घेत असतात. जे कर राज्य सरकार लावते, त्यामुळे दरवाढ होत असते. भाववाढीचा नीट अभ्यास केला पाहिजे. राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेल दरवाढीतून राजकारण करत असल्याचा आरोपच दरेकर यांनी केला.

मोदी सरकारला पेट्रोल-डिझेल दरवाढीच राजकारण करुन टार्गेट केले जात आहे. फडणवीस सरकारच्या काळात डिझेल-पेट्रोल वरचा व्हॅट कमी केला होता. त्यावेळी इंधनाचे दर कमी झाले होते. पण आता राज्य सरकारने वेगवेगळे कर लावले आहे. जर हे कर कमी केले तर पेट्रोल डिझेल दरवाढ होणार नाही, अशी माहितीही दरेकरांनी दिली. सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेतृत्त्व आहे. गोरगरिबांना त्याच्यामुळे गॅस सिलेंडर असो किंवा इतर सोयीसुविधा मिळत असल्याची स्तुतीसुमनेही दरेकर यांनी उधळली.

केवळ घोषणा अन् घोषणा राज्य सरकारकडून होतात. सरकारला वाटत आम्ही खंबीर आहोत, स्वतःलाच सरकार स्थिर आहे जे सांगावे लागते याचा अर्थ पूर्णपणे त्या तीन पक्षांमध्ये काही नीट चाललेले दिसत नाही. जी नाराजी आहे ती बाहेर येत आहे, अंतर्गत मोठ्या प्रमाणावर विविध विषयांवर वाद आहेत. मला वाटते असे तीन विचारधारेच सरकार फार काळ चालत नसते, असेही दरेकर म्हणाले.

Leave a Comment