वर्णभेदाच्या निषेधार्थ विंडीज संघ ‘हा’ लोगो लावून उतरणार मैदानात

इंग्लंड आण वेस्ट इंडिज या संघांमध्ये 8 जुलैपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. बिना प्रेक्षकांचे हे सामने खेळले जाणार आहेत. दोन्ही संघ या मालिकेची तयारी करत आहेत. मात्र दुसरीकडे वर्णभेद विरोधी लढ्यास पाठिंबा देण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ सामन्या दरम्यान आपल्या जर्सीच्या कॉलरवर ब्लॅक लाईव्ह्स मॅटरचा लोगो लावून मैदानात उतरणार आहे.

अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर ब्लॅक लाईव्ह्स मॅटर मोहिमेने जोर पकडला आहे. याविषयी बोलताना वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर म्हणाला की, आम्हाला असे वाटते की एकता दर्शविणे आणि जनजागृती करण्यात मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे.

Image Credited – Daily Telegraph

आयसीसीद्वारे परवानगी मिळालेल्या या लोगोला एलिशा होसानाने डिझाईन केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला प्रीमियर लीगमध्ये सर्व 20 क्लबच्या खेळाडूंनी आपल्या शर्टवर हा लोगो लावला होता.

ईएसपीएन क्रिकइंफोशी बोलताना होल्डर म्हणाला की, हा खेळांच्या इतिहासात आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघासाठी महत्त्वाचा क्षण आहे. आम्ही येथे विस्डन ट्रॉफी जिंकण्यासाठी आलो आहोत, मात्र जगात जे होत आहे ते देखील आम्हाला माहिती आहे. आम्ही न्याय आणि समानतेसाठी लढू. आम्ही लोगो लावण्याचा निर्णय सहज घेतलेला नाही. आम्हाला माहिती आहे त्वचेच्या रंगावरून टिप्पणी केल्यास कसे वाटते. समानता आणि एकता गरजेची आहे. जो पर्यंत ती येणार नाही आम्ही गप्प बसणार नाही.

Loading RSS Feed

Leave a Comment