कोरोना : रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी बाजारात येणार ‘आरोग्य संदेश’ मिठाई

बंगाली मिठाई आवडणाऱ्यांसाठी कोव्हिड-19 महामारीच्या काळात चांगली बातमी आहे. पश्चिम बंगाल सरकार लवकरच ‘आरोग्य संदेश’ नावाने एक खास मिठाई बाजारात आणणार आहे. यात सुंदरबनच्या मधाचा वापर केला जाईल व याद्वारे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळेल. पशु संसाधन विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गाईच्या दुधापासून बनलेल्या दह्यात सुंदरबनचे मध मिसळून आरोग्य संदेश मिठाई तयार केली जाईल. यात तुळशीचे अर्क देखील मिसळले जाईल. या संदर्भात एनडीटिव्हीने वृत्त दिले आहे.

त्यांनी सांगितले की, यात कोणत्याही कृत्रिम पदार्थाचा वापर केला जाणार नाही. आरोग्य संदेशची विक्री कोलकत्ता आणि विभागाच्या विक्री केंद्रांद्वारे केली जाईल.

या महिन्याच्या सुरुवातीला कोलकत्तामधील मिठाई बनविणाऱ्या दुकानदारांनी ‘इम्यूनिटी संदेश’ तयार केले होते. त्यांनी दावा केला होता की, यात वापरण्यात आलेले औषधी वनस्पती आणि मसाले जसे की हळद, तुळस, केशर, वेलची आणि मध हे रोगप्रतिकार शक्ती वाढवेल व कोरोनाशी लढण्यास मदत करेल. अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, संदेश रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आहे. मात्र हे कोव्हिड-19 आजारातून बरे करणार नाही. सुंदरबन प्रकरणांचे मंत्री मांतुराम पखीरा म्हणाले की, आरोग्य संदेशला बनविण्यासाठी मध पीरखली, झारखली आणि सुंदरबनच्या इतर भागांमधून जमा करून वैज्ञानिक पद्धतीने त्याचा साठा केला जाईल.

पुढील दोन महिन्यात ही मिठाई बाजारात येणार असून, याची किंमत खूप कमी असेल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Comment