पतंजलीचे घुमजाव; कोरोना प्रतिबंधक औषध बनवलेच नाही


नवी दिल्ली – जगभरातील बहुतांश देश हे कोरोना या संकटावर मात करण्यासाठी जीवापाड मेहनत घेत आहेत, त्याचबरोबर या महामारीला रोखणारे औषध शोधण्याचा प्रयत्न करत असतानाच योगगुरु रामदेव बाबा यांच्या पंतजली आयुर्वेदने कोरोनावर औषध शोधल्याचा मागील आठवड्यात दावा केला. त्याचबरोबर त्यांनी हे औषध लाँच देखील केले. पण या औषधावर केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयासह देशभरातील विविध राज्यांनी आक्षेप घेत पतंजलीच्या औषधावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्यातच उत्तराखंडच्या आयुर्वेद विभागाने याबाबत नोटीस जारी केल्यानंतर पतंजलीने कोरोनावरील औषध बनवल्याच्या दाव्यावरून घुमजाव केले आहे.

देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्ध पातळीवर शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. तर दुसरीकडे जगभरातील अनेक देश कोरोनावर औषध विकसित करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यातच गेल्या आठवड्यात बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला. पतंजलीने कोरोनिल नावाचे औषध लॉन्च केले. त्यानंतर औषधाच्या जाहिरातीवर बंदी आणत केंद्रीय आय़ुष मंत्रालयाने औषधाच्या चाचण्या सुरू केल्या.

जगासमोर पतंजलीचे औषध आल्यानंतर उत्तराखंडच्या आयुर्वेद विभागाने परवानगी दिली नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर पतंजलीला नोटीसही जारी केली होती. अखेर पतंजलीकडून या नोटिसीला उत्तर देण्यात आले आहे. यासंदर्भात हिंदी माध्यमांनी वृत्त दिले आहे. पतंजलीने नोटिसीला उत्तर देताना कोरोनावर औषध बनवल्याचा दाव्यावरून घुमजाव केले आहे. आम्ही कोरोना बरे करणारे कोणतेही औषध बनवले नसल्याचे पतंजलीने म्हटले आहे.

Leave a Comment