भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण


पुणे : पुण्यातील भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार आणि भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांना आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पिंपरीतील कोरोना रुग्णालयाला भेट दिली होती, त्यावेळी त्या बैठकीलाही लांडगे उपस्थित होते.

चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात सध्या दोघांवरही वैद्यकीय उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. पण, पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्यात आले होते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली. यावेळी राज्याचे बडे मंत्री तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. आमदार महेश लांडगे हे देखील त्याबैठकीला उपस्थित होते. त्याच बरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील घेतलेल्या बैठकीला ते उपस्थित होते. यावेळी अनेक नेत्यांशी त्यांचा संपर्क आला.

तर माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सहा दिवसांपूर्वी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण या कोरोनासाठी राखीव असलेल्या रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालय प्रशासनाकडून त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी फडणवीस यांच्यासोबत बराच वेळ आमदार महेश लांडगे होते.

त्यांचा फडणवीस यांच्यासोबत आलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क आला होता. तसेच, मतदार संघातील बऱ्याच ठिकाणी हायअलर्ट करण्यात आला आहे. काही भागांना कोरोनाचा कंन्टेंमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. तर, झोपडपट्टी भागाला कोरोनाचा केंद्रबिंदू म्हणून जाहीर केले आहे. अशा भागातील लोकांची होणारी अडचण पाहून आमदार लांडगे यांनी त्या भागाला प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांना मदत केली आहे. दैनंदिन गरजेच्या साहित्यासह जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला. दरम्यान, त्यांचा लोकांशी मोठ्या प्रमाणात संपर्क आल्याने त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळली आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

पुण्यातील विधान भवन येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आदींसह उच्चपदस्थ अधिकारी यांची बैठक झाली होती. जिल्ह्यातील आमदारांसह महेश लांडगे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. तसेच, आमदार लांडगे यांनी गेल्या आठवडाभर मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात वेळ घालवला आहे. आठवड्यातून एकवेळ महापालिकेत भेट देऊन त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यामुळे माजी खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर प्रमुख पदाधिकारी यांच्या संपर्कात आमदार लांडगे आले आहेत. दरम्यान लांडगे यांच्या संपर्कात आलेल्या सुमारे 100 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे.

Leave a Comment