जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याऱ्या पुण्यातील हाऊसिंग सोसायटीवर गुन्हा दाखल


पुणे : पुण्यातील औंध येथील एका हाऊसिंग सोसायटीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नव्याने सोसायटीमध्ये राहण्यासाठी आलेल्या कुटुंबियांना मेडिकल सर्टिफिकेट शिवाय प्रवेश करता येणार नसल्याचे सोसायटीच्या सेक्रेटरींनी सांगितल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सुधीर मेस्सी हे आपल्या कुटुंबियांसह रोहन निलय सोसायटीमध्ये नव्याने राहण्यास आले होते. त्यांचे सामान आणि ते सामान वाहण्यासाठी कामगारही त्यांच्यासोबत होते. पण मेस्सी यांना व त्यांच्या कुटुंबियांना सोसायटीच्या गेटवरच सोसायटीचे सेक्रेटरी सुनील शिवतारे यांनी अडवले आणि मेडिकल सर्टिफिकेटची मागणी केली. तसेच मेडिकल सर्टिफिकेट शिवाय सोसायटीमध्ये प्रवेश करता येणार नसल्याचे सांगितले.

सहकारी गृहनिर्माण सोसायटी यांना पालन करावयाचे नियम पुणे जिल्हाधिकारी यांनी प्रसारित केले आहेत. प्रशासनाने दिलेल्या आदेशांव्यतिरिक्त वेगळे आदेश काढण्यास सक्त मनाई केलेली आहे. असे असतानाही पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे पालन न करता सोसायटीच्या सेक्रेटरींनी सुधीर मेस्सी व त्यांच्या कुटुंबियांना सोसायटीमध्ये प्रवेशा करता मेडिकल सर्टिफिकेट बंधनकारक असल्याचा परस्पर आदेश काढला आणि जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या नियमांचा भंग केल्यामुळे सोसायटीचे सेक्रेटरी सुनील शिवतारे यांचे विरुद्ध कलम 188 अंतर्गत गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर आणि जिल्ह्यातील कोणत्याही सोसायट्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वत:चे निर्बंध घातल्यास संबंधित सोसायटीवर दंडनीय व कायदेशीर कारवाई करण्यात येतील, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काढले आहेत. यामुळे पुणे शहराच्या सहकारी संस्था उपनिबंधक स्नेहा जोशी यांनी संबधित सोसायटीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment