डोळे वटारुन बघाल तर डोळे काढून घेऊ; ‘मन की बात’मधून मोदींचा चीनला इशारा


नवी दिल्ली – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात लडाखमध्ये चीनला भारताने करारा जवाब दिल्याचे म्हटले आहे. डोळे वटारुन आमच्या देशाकडे पाहणाऱ्यांना भारताने कायम धडा शिकवला आहे. डोळेवर करुन आमच्या भारतमातेकडे जर पाहाल तर तुमचे डोळे काढून घेण्याची ताकद आमच्यात असल्याचे भारतीय जवानांनी दाखवून दिले आहे. आमचे जे जवान शहीद झाले आहेत त्याबद्दल संपूर्ण देशाला अतीव दुःख आहे. पण ज्या कुटुंबातील जवान शहीद झाले आहेत, त्यांनीही घरातील दुसऱ्या मुलांना सैन्यातच भरती करणार असल्याचे म्हटले आहे. देशाला शहीदांच्या कुटुंबांबद्दल अभिमान आणि गर्व असल्याचेही मोदींनी म्हटले आहे.

देशातील कोरोनाचे संकट वाढत असल्यावर आपण अनेकदा बोललो आहोत. अनेकांना वाटत आहे की हे वर्ष कधी संपेल. कुणी म्हणत आहे की हे वर्ष अशुभ आहे. लोकांना हे वर्ष लवकर संपावे असे वाटत आहे. सध्या अशा चर्चा का होत आहेत याचा विचार करतो, तेव्हा मला हेच वाटते की यामागचे कोरोनाचं संकट हेच कारण आहे. आपल्याला सहा-सात महिन्यांपूर्वी कोरोनाचे संकट येणार हे कुठे ठाऊक होते? असे मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. अम्फान, निसर्ग यासारखी चक्रीवादळे येऊन गेली. पण त्यातच शेजारी देश कुरापती काढतो आहे. तरीही आपण सगळ्या संकटांना तोंड देत आहोत. हे वर्ष अशुभ नाही हे लक्षात घ्या. एका वर्षात एक आव्हान येवो किंवा ५० आव्हाने येवोत डगमगून जायचे नाही, हे भारताचे वैशिष्ट्य आहे.

भारताने गेल्या अनेक वर्षांपासून कमी संकटांचा सामना केला आहे. अनेक संकटांचा सामना आपण एका वर्षात केला आहे. पण सध्या डगमगून जाण्याची गरज नाही. आपण संकटांचा सामना करत असल्याचेही मोदींनी म्हटले आहे. त्यातच आपल्याला अनेक संकटांचा सामना करत पुढे जायचे आहे. आपल्याला नवी स्वप्ने या वर्षातच पाहायची आहेत हे कुणीही विसरु नये. १३० कोटी भारतीयांवर मला पूर्ण विश्वास असल्याचेही मोदींनी म्हटले आहे. संकट कितीही मोठे असले तरीही भारताचे संस्कार हे निस्वार्थ भावनेने सेवेची प्रेरणा देतात हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशात यंदाच्या वर्षात एकामागून एक संकटे येत गेली. अशी संकटे येतच असतात म्हणून पूर्ण वर्षाला खराब मानायची गरज नाही. एक किंवा पन्नास अडचणी वर्षभरात येऊ द्या त्यामुळे डगमगून जायची गरज नसल्याचे म्हणत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, मित्रांनो अडचणी येतात, संकट येतात पहिले सहा महिने खराब गेले म्हणून संपूर्ण वर्षच खराब मानण्याची बिल्कूल गरज नाही. एका वर्षात एक किंवा पन्नास अडचणी आल्या तरी ते वर्ष खराब होत नाही. भारताचा इतिहासच अडचणींवर मात करीत आणखीन चमकदार कामगिरी करण्याचा राहिला आहे. शेकडो वर्षांपासून देशावर अतिक्रमणे झाली, त्यावेळी देखील भारताची संरचना, संस्कृती संपून जाईल असे अनेकांना वाटत होते. पण त्यातूनही भारत अधिक भव्य होऊन पुढे आला. भारतात अनेक अडचणी आल्या तेव्हा नव्या गोष्टींची निर्मिती झाली, नवे साहित्य रचले गेले, नवे शोध लावले गेले, नवे सिद्धांत निश्चित झाले. यशस्वीतेच्या शिड्या भारत कायमच चढत राहिला याच भावनेने आजही आपल्याला पुढेच जात रहायचे आहे.

Leave a Comment