सोनीच्या गेमिंग प्लेस्टेशनमध्ये शोधा त्रुटी आणि मिळवा तब्बल 38 लाख रुपये

जर तुम्हाला हँकिंगबद्दल माहिती आहे आणि कोडिंग येत असल्यास तब्बल 38 लाख रुपये तुमची वाट पाहत आहेत. इलेक्ट्रॉनिक कंपनी सोनीने बग बाउंटी प्रोग्रामची घोषणा केली आहे. या प्रोग्राम अंतर्गत कोणीही गेमर्स अथवा सर्वसाधारण व्यक्तीने कंपनीच्या गेमिंग कंसोल प्लेस्टेशन 4 आणि प्लेस्टशन नेटवर्कमध्ये बग (त्रुटी) शोधल्यास त्याला बक्षीस मिळेल.

सोनीने या बग बाउंटी प्रोग्रामची घोषणा करताना सांगितले की, सिक्युरिटी आमच्या प्रोडक्टचा मूळ भाग आहे, जो आमच्या कम्यूनिटीला शानदार बनवतो. सिक्युरिटीला मजबूत करण्यासाठी आम्ही रिसर्च कम्यूनिटीला खूप महत्त्व देतो. कंपनीने या प्रोग्रामसाठी हॅकरवनसोबत भागीदारी केली आहे. या प्रोग्राम अंतर्गत पीएस-4 सिस्टम, ऑपरेटिंग सिस्टम, एक्सेसरीज, प्लेस्टेशन नेटवर्कमध्ये त्रुटी शोधावी लागेल.

सोनीने या प्रोग्रामच्या बक्षीसाच्या रक्कमेला 4 भागात विभागले असून, यात क्रिटिकल, हाय सेव्हरिटी, मीडियम सेव्हरिटी आणि लो सेव्हरिटीचा समावेश आहे. प्लेस्टेशन 4 मध्ये क्रिटिकल बग शोधणाऱ्याला 50 हजार डॉलर्स म्हणजेच 38 लाख रुपये मिळतील. हाय मीडियम आणि लो सेव्हरिटीमध्ये बग शोधणाऱ्याला क्रमशः 10 हजार डॉलर्स (7.5 लाख रुपये), 2500 डॉलर्स (2 लाख रुपये) आणि 500 डॉलर्स (38 हजार रुपये) मिळतील.

प्लेस्टेशन नेटवर्कमध्ये क्रिटिकल बग शोधल्यास 3 हजार डॉलर्स (2.5 लाख रुपये) मिळतील. तर हाय मीडियम आणि लो सेव्हरिटीमध्ये बग शोधणाऱ्याला 1000 ते 100 डॉलर्स बक्षीस मिळेल.

Leave a Comment