धक्कादायक! अवघ्या 3 रुपये 46 पैशांचे कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याची 15 किमी पायपीट

कोरोना व्हायरस महामारीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे. कोरोना व्हायरसमुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे, अशातच कर्नाटक येथील शेतकऱ्याला अवघ्या 3 रुपये 46 रुपये कर्ज फेडण्यासाठी तब्बल 15 किमी पायपीट करावी लागल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटकमधील शिमोगा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला निथ्थूर येथील कॅनरा बँकेच्या शाखेने त्वरित कर्ज भरण्यास सांगितले. मात्र प्रवासाचे कोणतेही साधन नसलेल्या या शेतकऱ्याला बँकेत पोहचण्यासाठी 15 किमी पायी चालत जावे लागले.

अमदे लक्ष्मीनारायण या शेतकऱ्याने काही दिवसांपुर्वी 35 हजार रुपयांचे शेती कर्ज घेतले होते. या पैकी 32 हजार रुपये सरकारने माफ केले होते व लक्ष्मीनारायण यांनी उरलेले 3 हजार रुपयांची देखील बँकेला परतफेड केली होती. मात्र बँक अधिकाऱ्यांनी फोन करत त्यांना त्वरित कर्ज भरण्यास सांगितले. मात्र घाबरलेले लक्ष्मीनारायण प्रवासाचे कोणतेही साधन नसताना पायी चालत अवघे 3 रुपये 46 पैसे कर्ज फेडण्यासाठी बँकेत पोहचले.

लक्ष्मीनारायण यांनी सांगितले की, बँकेने त्वरित येण्यास सांगितल्यावर मी घाबरलो. लॉकडाऊनमुळे बस सेवा सुरू नव्हती. माझ्याकडेही कोणते वाहन नाही. त्यामुळे मी 3 रुपये 46 पैशांची परतफेड करण्यासाठी पायी बँकेत पोहचलो. बँकेच्या या अमानवीय कृत्यामुळे मी दुखावलो गेलो आहे.

याबाबत कॅनरा बँकेचे मॅनेजर एल पिंगवा यांनी सांगितले की, ऑडिटचे काम सुरू असल्याने सर्वांना कर्जाची रक्कम भरायची होती. यासोबतच त्यांची सही देखील आम्हाला हवी होती. त्यामुळे आम्ही त्यांना फोन केला.

Leave a Comment