चीनला धडा शिकवणार भारत, लडाखमध्ये उभारणार 134 सेटेलाईट फोन टर्मिनल

लडाखमध्ये भारतीय सैन्य चीनच्या प्रत्येक हालचालीचे उत्तर देण्यास तयार आहे. चीनच्या प्रत्येक पावलाला उत्तर देण्यासाठी भारत शस्त्र व सैन्य संख्यातर चीनी सीमेवर वाढवत आहेच. सोबतच आता लडाखच्या सीमेला लागून असलेल्या भागात संचार सेवा मजबूत करण्यासाठी पावले उचलत आहे.  लडाखच्या सीमावर्ती भागांमध्ये दळणवळणाची सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी केंद्राने योजना तयार केली आहे. सरकारने लडाखमध्ये 134 डिजिटल सेटेलाईट फोन टर्मिनल उभारण्याची योजना बनवली आहे. या संदर्भात आज तकने वृत्त दिले आहे.

लडाखचे एग्झिक्यूटिव्ह काउंसिलर कुनचोक स्टांजी यांनी सांगितले की, लडाखच्या 57 गावांमध्ये कम्यूनिकेशन प्रणाली मजबूत केली जाईल. यासाठी मागील 8 वर्षांपासून प्रयत्न केले जात होते. सध्या 24 मोबाईल टॉवर्सला परवानगी मिळाली असून, अजून 25 मोबाईल टॉवर्सची आवश्यकता आहे.

संपुर्ण जम्मू-काश्मिर आणि लडाखमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 336.89 कोटी रुपये खर्च केले जातील. केवळ लडाखबद्दल सांगायचे तर येथे 57.4 कोटी रुपये खर्च येईल. यामुळे जम्मू-काश्मिरमधील अनेक गावे फोन सेवेचा लाभ घेऊ शकतील. लडाखच्या गलवान खोरे, दौलत बेग ओल्डी, हॉट स्प्रिंग्स, चुशूल या भागांमध्ये सेटेलाईट फोन कनेक्शन मिळेल. हे सर्व क्षेत्र एलएसीला लागून आहे.

स्टांजी यांनी सांगितले की, चीनने आपल्या सीमेत फोन नेटवर्कचा विस्तार केला आहे. त्यांच्या येथे नेटवर्कची स्थिती चांगली आहे. भारताने देखील आता या दिशेने काम सुरू केले आहे. येथील विषम भौगोलिक स्थितीमुळे प्रत्येक गावात मोबाईल टॉवर्सची गरज पडते. सीमेला लागून असलेल्या अनेक भागात नेटवर्कची समस्या असते. नवीन मोबाईल टॉवर्समुळे ही समस्या दूर होईल, अशी आशा आहे.

Leave a Comment