टीक-टॉकला टक्कर देणार युट्यूब, लवकरच लाँच करणार हे भन्नाट फीचर

काही दिवसांपुर्वी युट्यूब विरुद्ध टीक-टॉक हे प्रकरण चांगलेच गाजले होते. या वादात टीक-टॉकचे प्ले स्टोरवरील रेटिंग देखील कमी झाले होते. आताच या पार्श्वभूमीवर युट्यूब आपल्या नवीन फीचरवर काम करत असल्याचे समोर आले आहे. हे नवीन फीचर युट्यूब मोबाईल अ‍ॅपसाठी आहे. या फीचरद्वारे युजर्स टीक-टॉकप्रमाणे 15 सेंकदांचे शॉर्ट व्हिडीओ अपलोड करू शकतील. सध्या या फीचरचे टेस्टिंग सुरू असून, मोजक्याच लोकांसाठी हे फीचर उपलब्ध आहे. लवकरच सर्व युजर्ससाठी हे फीचर रोलआउट केले जाणार आहे. या आधी देखील माहिती समोर आली होती की, कंपनी या फीचरला ‘युट्यूब शॉर्ट्स’ असे नाव देणार आहे.

कंपनीने या फीचरची माहिती देताना सांगितले की, या फीचरच्या मदतीने क्रिएटर्स युट्यूब मोबाईल अ‍ॅपद्वारे थेट व्हिडीओ क्लिप रेकॉर्ड करून अपलोड करू शकतील. व्हिडीओ जर 15 सेंकदांपेक्षा कमी असल्यास आपोआप प्लॅटफॉर्मवर अपलोड होईल. जर 15 सेंकदांपेक्षा जास्त असल्यास व्हिडीओला फोन गॅलेरीमधून अपलोड करावे लागेल.

हे फीचर्स अँड्राईड आणि आयओएस युजर्ससाठी उपलब्ध असेल. या फीचरमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी फिल्टर, इफेक्ट्स, म्यूझिक आणि अन्य कोणते टूल्स मिळतील याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, युजर्स युट्यूब स्टोरिज अर्थात युट्यूब रिल्सद्वारे देखील शॉर्ट व्हिडीओ अपलोड करू शकतात.

Leave a Comment