
नवी दिल्ली – देशावर कोरानाचे पडलेले काळे सावट सध्या आणखीनच गडद होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कारण देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात मागील २४ तासात आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. काल दिवसभरात देशात सुमारे १७ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आल्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा चार लाख ९० हजार ४०१ वर पोहचला आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्युची संख्या देखील वाढली आहे. दरम्यान, देशातील मृतांची संख्याही १५ हजारांच्या पुढे पोहचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोनाबाधितांची संख्या पाच लाखांच्या जवळ
कोरोनाच्या दैनंदिन वाढीचा विचार करता, आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे १७ हजार २९६ नवीन रुग्ण आढळून आल्याने आजवरची एकूण संख्या ४,९०,४०१ एवढी झाली. तर काल दिवसभरात कोरोनामुळे ४०७ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची एकूण संख्या १५ हजार ३०१ एवढी झाली आहे.
कोरोनाबाधितांची संख्या १४ हजारांहून अधिक वाढण्याचा हा सलग सातवा दिवस होता. २० जून रोजी १४ हजार ५१६, २१ जून रोजी १५ हजार ४१३, २२ जून रोजी १४ हजार ८२१, २३ जून रोजी १४ हजार ९३३, तर २४ जून रोजी रुग्णांच्या संख्येत १५ हजार ९६८ रूग्णांची वाढ झाली. याचाच अर्थ, कोरोनाच्या प्रकरणांत २० जूनपासून एक लाख रुग्णांची भर पडली असून, १ जूनपासून रुग्णसंख्या २.८२ लाखांहून अधिक वाढली आहे.
यात दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले असून ते ५७.४३ टक्के झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. सध्या एक लाख ८९ हजार ४६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दोन लाख ८५ हजार ६३७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
