कोरोनिलची ट्रायल घेतलीच नाही; निम्सच्या डॉक्टरांनी मारली पलटी


नवी दिल्ली : योगगुरु रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेदने कोरोना प्रतिबंधक कोरोनिल हे औषध जगासमोर आणल्या नंतर ते औषध चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. योगगुरू रामदेव बाबा यांच्यासमोरील अडचणी या औषधामुळे अधिकच वाढत चालल्या आहेत. या औषधावर आधी केंद्र आणि विविध राज्य सरकारने प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता ज्या डॉक्टरांच्या सहयोगाने आपण जयपूरच्या निम्स रुग्णालयात या औषधाचे क्लिनिक ट्रायल केल्याचे पतंजलीने सांगितले होते, आता त्याच डॉक्टरांनी पलटी मारली आहे.

यावर निम्सचे चेअरमन बीएस तोमर यांनी सांगितले, की पतंजलीच्या कोरोनिलचे ट्रायल आपल्या रुग्णालयात झालेच नाही तर आयुर्वेदिक औषधे फक्त कोरोना रुग्णांना देण्यात आली. त्याचबरोबर आम्ही कोरोना रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अवश्वगंधा, तुळस आणि गुळवेल दिले होते. याला बाबा रामदेव यांनी कोरोनाचा 100 टक्के उपचार करणारे औषध कसे म्हटले, याबाबत मी आता काहीच सांगू शकत नाही. याबाबत फक्त रामदेव बाबाच सांगू शकतात.

आयुष मंत्रालयाने कोरोनिल लाँच होताच पतंजलीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह लावले होते. त्याचबरोबर पतंजलीला या औषधाबाबत सविस्तर माहिती देण्यास सांगितले. तोपर्यंत औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले. यानंतर उत्तराखंडच्या आयुर्वेद विभागानेही पतंजलीला नोटिस बजावली. खोकला-तापच्या औषधासाठी परवाना दिला होता, कोरोना औषधासाठी परवाना कसा मिळाला, याची विचारणा केली. दरम्यान बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधात बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये याचिका करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

Leave a Comment