आपल्या ‘सेल्फ-बॅलन्स स्कूटर’चे उत्पादन बंद करणार Segway


नवी दिल्ली – पर्यटक तसेच पोलीस दलासाठी वरदान ठरलेल्या आपल्या ‘सेल्फ-बॅलन्स स्कूटर’चे उत्पादन प्रसिद्ध Segway कंपनी बंद करणार आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांसाठी ही इलेक्ट्रिक दुचाकी अतिशय लोकप्रिय होती, पण या दुचाकीला म्हणावा तसा प्रतिसाद सर्वसामान्यांमध्ये मिळाला नाही. ही सेल्फ-बॅलेन्सिंग दुचाकी सेगवेने 2001 मध्ये लाँच केली होती, ज्यास पर्सनल ट्रांसपोर्टसाठी मोठ्या प्रमाणात पसंती अपेक्षित होती. अमेरिकन अभियंता डीन कामेन यांनी सेगवे या दुचाकीचे निर्माण केले होते. दोन्ही बाजूंना चाके असणारी ही दुचाकी एकट्या प्रवाशासाठी अतिशय उपयुक्त होती.

ही गाडी किंचित पुढे झुकून चालवली जाते व मागच्या बाजूला झुकून मागे घेता येऊ शकते किंवा गाडीला वळविता येऊ शकते. ही दुचाकी मोठ्या धामधूमीत लाँच करण्यात आली होती, परंतु मार्केटमध्ये स्थान टीकवून ठेवण्यासाठी या दुचाकीला फार धडपडावे लागले होते. म्हणूनच की काय आता अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायर शहरातील कारखान्यात तयार होणाऱ्या या दुचाकीचे उत्पादन आता 15 जुलैपासून बंद करण्यात येणार आहे. या वृत्ताला दुजोरा देताना सेगवेचे अध्यक्ष जुडी काय म्हणाले की, पहिल्या दशकात सेगवे वैयक्तिक वाहतूकदारांची सुरक्षा आणि कायद्याच्या अंमलबजावणीत मदत म्हणून महत्त्वपूर्ण बनले, ज्याकडे एक प्रभावी आणि कार्यक्षम वैयक्तिक वाहन म्हणून पाहिले गेले.

यासह, Segway SE-3 Patroller आणि Segway Robotics Mobility Platform या दोन अन्य मॉडेल्सचे उत्पादन देखील थांबवले जाईल, ज्यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे, कंपनीची ही दुचाकी अनेक हाय-प्रोफाइल अपघातांनाही कारणीभूत ठरली आहे. त्यात 2015 मध्ये सेगवेवर चालत असताना कॅमेरामॅनने जमैकाचा वेगवान धावपटू उसैन बोल्ट यांच्याशी झालेल्या धडकीचा समावेश आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुशसुद्धा 2003 मध्ये त्यांच्या सेगवेवरून पडताना दिसले होते.

Leave a Comment