‘मोदीजी न घाबरता सांगा चीनने जमीन बळकावली, देश तुमच्यासोबत’, राहुल गांधींचे मोदींना आवाहन

लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीनमधील सीमावादावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्यांनी एकीकडे पंतप्रधान मोदींना आश्वासन दिले आहे की या संकटाच्या काळात संपुर्ण देश तुमच्यासोबत आहे. तर दुसरीकडे घटनेचे सत्य सर्वांना सांगावे अशीही मागणी केली आहे.

राहुल गांधी व्हिडीओमध्ये म्हणाले की, संपुर्ण देश एकजूट होऊन सैनिक आणि सरकारसोबत आहे. काही दिवसांपुर्वी पंतप्रधान म्हणाले होते की भारताची एक इंच देखील जमीन कोणी घेतलेली नाही. कोणीही भारतात घुसलेले नाही. मात्र ऐकायला मिळत आहे की, सेटेलाईट फोटोग्राफ्समध्ये दिसत आहे, लडाखमधील नागरिक, निवृत्त लष्कर अधिकारी सांगत आहे की चीनने आपल्या जमिनीवर कब्जा केला आहे. एक नाहीतर तीन ठिकाणी चीनने जमीन बळकावली आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, पंतप्रधानजी तुम्हाला सत्य बोलावे लागेल. घाबरण्याची गरज नाही. जर तुम्ही म्हणाला जमीन गेलेली नाही व खरचं जमीन गेली असल्यास चीनला याचा फायदा होईल. तुम्हाला न घाबरता बोलावे लागेल की, हा चीनने आपली जमीन बळकावली आहे व आम्ही कारवाई करणार आहे. संपुर्ण देश तुमच्यासोबत आहे. याशिवाय आपल्या शहीद जवानांना शस्त्रांशिवाय का आणि कोणी पाठवले ?, असा प्रश्न देखील त्यांनी मोदींना विचारला.

Leave a Comment