15 जुलैपर्यंत बंद राहणार देशातील आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा


नवी दिल्ली – केंद्र सरकारने आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून ठप्प असलेली प्रवासी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा 15 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान भारतीयांना प्रवासी विमानांनी परदेशात जाण्याची किंवा परतण्याची सुविधा उपलब्ध नसेल. अशी माहिती नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून (DGCA) देण्यात आली आहे.

दरम्यान देशामध्ये कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात सध्या लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू आहे. पण या लॉकडाऊनमध्ये काही गोष्टींवरील बंदी हळूहळू उठवण्यात येत आहेत. पण आंतरराष्ट्रीय विमान सेवा अद्याप सुरळीत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. डीजीसीएने कार्गो आणि अन्य पूर्व परवानगी असलेल्या विमानांची उड्डाणे चालूच ठेवलेली आहेत.

परदेशामध्ये अडकलेल्या भारतीयांना, पर्यटकांसाठी सध्या वंदे भारत ही विशेष मोहीम सुरू आहे. त्यानुसार जगभरातून भारतीयांची परदेशातून घरवापसी केली जात आहे. दरम्यान देशांतर्गत विमानसेवेला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार पुरेशी खबरदारी घेत आता देशांतर्गत प्रवास करता येऊ शकतो.

Leave a Comment