इंदिरा गांधीची मी नात आहे, मी सत्य बोलतच राहीन, जी कारवाई करायची आहे ती करा!


नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वारंवार कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात उत्तर प्रदेश सरकारला अपयश येत असल्याची टीका करत आहेत. त्यानंतर गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काही भाजपा नेत्यांकडून होत होती. त्याला उत्तर देताना प्रियंका गांधी यांनी मी इंदिरा गांधीची नात आहे, जी कारवाई करायची आहे ती करा, मी सत्य बोलतच राहीन, अशा शब्दांत उत्तर प्रदेश सरकारला सुनावले आहे.


माझी लोकांशी जनतेची सेवक या नात्याने बांधिलकी आहे. सरकारची स्तुती करायला मी बसलेले नाही. सरकारच्या विविध विभागातून मला धमकी मिळत आहे, पण यामध्ये सरकारने वेळ वाया घालवू नये. मी सत्य बोलतच राहीन. मी इतर विरोधी पक्षांप्रमाणे भाजपची अघोषित प्रवक्ता नसल्याचे ट्विट करत प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारला आव्हान दिले आहे.

लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेल्या मजुरांना घरी आणण्यासाठी काही दिवसांपूर्वी प्रियंका गांधी यांनी बस गाड्यांची सोय करण्याची तयारी दाखवली होती. काँग्रेस पक्ष यासाठीचा सर्व खर्च करेल असेही गांधी यांनी म्हटले होते. पण उत्तर प्रदेश सरकार आणि प्रियंका गांधी यांच्यात या बसगाड्यांना परवानगी देण्यावरुन बराचकाळ संघर्ष चालला होता. त्यामुळे आता प्रियंका गांधींनी घेतलेल्या सडेतोड भूमिकेवर भाजप नेते काय प्रतिक्रीया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment