कौतुकास्पद : ऑनलाईन सुविधा नसल्याने येथे भरते चक्क ‘लाउडस्पीकर’ शाळा

लॉकडाऊनमध्ये मुलांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये यासाठी देशभरातील बहुतांश शाळा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवत आहेत. मात्र प्रत्येकाकडेच स्मार्टफोन, इंटरनेटची सुविधा नसते. झारखंडच्या दुमका येथील आदिवासी भागातील बानकाठी गावात अधिकांश विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही. यावर पर्याय म्हणून शाळेच मुख्याध्यापक श्याम किशोर सिंह गांधी यांनी मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी संपुर्ण गावातच लाउडस्पीकर लावले आहेत. याच्या माध्यमातून 16 एप्रिलपासून विद्यार्थ्यांना दररोज 2 तास शिकवले जात आहे.

हे लाउडस्पीकर झाडांवर आणि भितींवर लावण्यात आलेले आहेत. 7 शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. गांधी यांनी सांगितले की, पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गात एकूण 246 विद्यार्थी आहेत व 204 जणांकडे मोबाईल नाही. वर्ग 10 वाजता सुरू होतो. एखाद्या विद्यार्थ्याला जर काही शंका असल्यास कोणाच्याही मोबाईलवरून मला पाठवतात व ती शंका दुसऱ्या दिवशी सोडवली जाते.

त्यांनी सांगितले की, ही लाउडस्पीकर पद्धत काम करत आहे. जे काही शिकवले जात आहे, ते विद्यार्थ्यांना समजत आहे. विद्यार्थी आता अभ्यासाचा आनंद घेत आहेत. दुमका जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी पूनम कुमारी यांनी देखील या अभियानाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. जिल्ह्याच्या सर्व सरकारी शाळांनी हे मॉडेल स्विकारावे.

Leave a Comment