शरद पवारांवर टीका; रामदास आठवलेंचा पडळकरांना सल्ला


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल विधान परिषदेचे नवनिर्वाचित भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे शरद पवार यांच्याबाबत गोपीचंद पडळकर यांनी केलेले वक्तव्य अयोग्य आणि अवमानकारक असल्याचे रामदास आठवले ट्विटरवर म्हणाले आहेत. रामदास आठवले यांनी या वक्तव्याप्रकरणी पडळकरांना एक मोलाचा सल्ला दिला आहे.


शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. सर्व महाराष्ट्राला ते आदरणीय आहेत. त्यांच्याबद्दल गोपीचंद पडळकर यांनी केलेले वक्तव्य अयोग्य आणि अवमानकारक आहे. एकमेकांचा आदर करणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे पडळकरांनी ते वक्तव्य मागे घ्यावे, असा सल्ला रामदास आठवले यांनी गोपीचंद पडळकर यांना दिला आहे.

दरम्यान, बारामतीत गोपीचंद पडळकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडळकरांच्या वक्तव्यावर त्यांच्याविरोधात दाखल झालेला हा राज्यातील पहिला गुन्हा आहे. राज्यात इतर ठिकाणी देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

Leave a Comment