धक्कादायक : बिहार-उत्तरप्रदेशमध्ये वीज पडून आतापर्यंत 112 जणांचा मृत्यू

बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये वीज पडून आतापर्यंत 112 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बिहार व उत्तर प्रदेश सरकारने मृतांच्या कुटुंबाना आर्थिक सहाय्यता देणार असल्याची घोषणा केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला. बिहार राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने या संदर्भात गुरूवारी माहिती दिली की आकाशीय वीज पडून राज्यातील 83 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र शुक्रवारी सकाळपर्यंत हा आकडा 88 वर पोहचला आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत 24 जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.

वीज पडून सर्वाधिक मृत्यू बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यात झाले असून, येथे आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये नुकसान भरपाई देणार असल्याचे सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही वीज कोसळल्याने झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या सुचनांचे पालन करावे असे सांगितले आहे. सोबतच खराब हवामानात घरातच राहावे असे म्हटले आहे.

Leave a Comment