पश्चिम बंगालने 31 जुलैपर्यंत वाढवला लॉकडाऊन; ममता बॅनर्जी यांची घोषणा


कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 31 जुलैपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी यासंदर्भात बुधवारी घोषणा केली. त्याचबरोबर यावेळी त्यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्यात आल्याचे सांगितले आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये लागू असलेल्या लॉकडाऊनचा कालावधी 30 जून रोजी संपणार आहे.

ममता बॅनर्जी राज्य सचिवालयासमोर सभागृहात सर्वपक्षीय बैठकीत बोलताना म्हणाल्या की, विचारांची भिन्नता नेत्यांमध्ये दिसून आली, पण, सरतेशेवटी हा निर्णय घेण्यात आला की, लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथीलता देण्यासोबत त्याचा कालावधी 31 जुलैपर्यंत वाढवण्यात यावा. पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची बाधा झालेल्या 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 591 वर पोहोचला आहे. याचसोबत राज्यात कोरोनाचे 445 नवे रुग्ण समोर आले आहेत. नव्या रुग्णांसोबतच राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढून 15173 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी उपचारानंतर 484 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत राज्यात 9702 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालचा डिस्चार्ज रेट 63.94 टक्के एवढा आहे. 23 जुलैपर्यंत एकूण 4,20,277 टेस्ट करण्यात आल्या आहेत. तसेच 24 जून रोजी 9,489 टेस्ट करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये एकूण 4,29,766 टेस्ट करण्यात आल्या आहेत. प्रति दहा लाख लोकांमागे 4,775 टेस्ट केल्या जात आहेत. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत 582 सरकारी क्वॉरंटाइन सेंटर्स आहेत आणि यामध्ये 8585 लोकांना सध्या क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. आतापर्यंत 92189 लोकांना सरकारी क्वॉरंटाइनमधून सोडण्यात आले आहे.

Leave a Comment