मोदींना उद्धव ठाकरेंची एमडी आणि एमएसच्या परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती


मुंबई : देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट आणखीनच गडद होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यातच देशात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी आघाडीवर आहेत. यातच एमडी आणि एमएसच्या (MD-MS Exam) परीक्षा 30 जुलैच्या आधी करण्याचे आदेश मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आदेशानंतर ही परीक्षा स्थगित करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यात मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला डिसेंबर 2020 पर्यंत परीक्षा स्थगित करण्याची विनंती भारत सरकारकडून केली जावी, असे उद्धव ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंनी आपल्या पत्रात, अंतिम वर्षातील एमडी एमएसचे अनेक विद्यार्थी निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. सध्या महाराष्ट्र सरकार आणि महानगरपालिका दवाखाने तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ते कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी तसेच क्लिनिकल व्यवस्थापनास मदत करण्यात आघाडीवर आहेत. त्यांच्या परीक्षा जर वेळापत्रकानुसार घेण्यात आल्या तर या अत्यंत महत्त्वाच्या काळात प्रशिक्षित डॉक्टरांची कमतरता भासेल, असे पत्रात म्हटले आहे. केंद्रीय परिषदांनी दिलेल्या निर्देशानुसार आणि विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या ठरावानुसार उन्हाळी 2020 वैद्यकीय परीक्षा 15 जुलैपासून घेण्याचे (प्रथम वर्ष वैद्यकीय अभ्यासक्रम 2019 वगळून) विद्यापीठाने जाहीर केले आहे.


याआधीच विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या/अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण परीक्षा ज्यांना द्यायच्या आहेत, त्यांनी विद्यापीठाकडे लेखी स्वरूपात द्यावे, त्या परीक्षा घेण्याबाबत कोरोना प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे राज्यावर ओढावलेले कोरोनाचे वाढते संकट पाहता आयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या प्रलंबित परीक्षा जुलै महिन्यात घेण्यास महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही, अशी भूमिका काल, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारने मांडली आहे.

Leave a Comment