गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याला रोहित पवारांचे उत्तर


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्षेपार्ह शब्दात टीका केल्यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरु असून निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टीव्हीवर येण्यासाठी, बातम्या होण्यासाठी काही लोक अशी वक्तव्य करतात, असे रोहित पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.

ज्या पक्षातील गोपीचंद पडळकर आहेत त्या पक्षाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस आहेत. वक्तव्य केल्यानंतर काही वेळानंतर त्यांच्याच नेत्यांनी त्यांना झापले असे आम्हाला कळाले. त्यांच्या नेत्यांकडून गोपीचंद पडळकर यांनी शिकले पाहिजे. त्यांच्या नेत्यांनी सांगितल्यावर आम्ही काय बोलणार. काही लोक टीव्हीवर येण्यासाठी, बातम्या होण्यासाठी अशी वक्तव्य करत असतात. ओघाच्या नादात आपण काय बोलत आहोत हे विसरुन जातात. ओघाच्या नादात त्यांच्याकडून चूक झाल्याचे फडणवीस यांनी मान्य केल्याचे, रोहित पवार यांनी म्हटले आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, असे माझे मत आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचे नेतृत्त्व करत आहेत. त्यांची राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका कायम राहिली आहे. ते पुढेही ती चालू ठेवतील. कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन त्यांच्याकडे नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचे आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे ही त्यांची भूमिका असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment