राजीव गांधी फाउंडेशनला चीनने केले फंडिंग, रविशंकर प्रसाद यांचा दावा

चीनने राजीव गांधी फाउंडेशनला फंडिग केल्याचा दावा केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. रविशंकर प्रसाद म्हणाले की, राजीव गांधी फाउंडेशनला चीनने पैसा दिला आहे. काँग्रेसने हे सांगावे की हे प्रेम कसे वाढले. त्यांच्या कार्यकाळातच चीनने आपल्या जमिनीवर कब्जा केला. कायद्यानुसार कोणताही पक्ष सरकारच्या परवानगी शिवाय परदेशातून पैसे घेऊ शकत नाही. या निधीसाठी काँग्रेसने सरकारची परवानगी घेतली होती का हे स्पष्ट करावे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, प्रसाद म्हणाले की, राजीव गांधी फाउंडेशनच्या 2005-06 च्या डोनरच्या यादीत चीनच्या दुतावासाने रक्कम दिली असल्याचे स्पष्ट लिहिलेले आहे. असे काय झाले ? काय गरज पडली ? यात अनेक उद्योगपती, पीएसयूची नावे देखील आहेत. हे सर्वकाही विचारपुर्वक झाले का ? यानंतर काँग्रेसच्या काळात भारत-चीनमध्ये व्यापार तूट 33 पट वाढली. काँग्रेसने याबाबत उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

रविशंकर प्रसाद यांनी प्रश्न उपस्थित केला की, फॉरेन कॉन्ट्रिब्यूशन रेग्यूलेटरी कायदा 1976 नुसार कोणताही उमेदवार, राजकीय पक्ष परदेशातून पैसे घेऊ शकत नाही. विना सरकारच्या परवानगी शिवाय परदेशातून फंडिग घेता येत नाही. चीनकडून पैसे घेण्याआधी केंद्र सरकारची परवानगी घेतली का ? चीन सोबत फ्री ट्रेडसाठी हे पैसे घेतले का ?, असे प्रश्न त्यांनी काँग्रेसला विचारले आहेत.

रविशंकर प्रसाद यांच्यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देखील या मुद्यावरून काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस आणि चीनमधील हेच नाते रहस्य असल्याचे त्यांनी म्हटले.

Leave a Comment