काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी आक्रमक, मी मोदींना घाबरत नाही


नवी दिल्ली – देशातील प्रत्येक घडामोडीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठीत आज अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले. याबैठकीत पक्षाच्याच एका नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट टीका न करता पक्षाच्या धोरणावंर टीका केली पाहिजे, असे मत मांडले. त्या नेत्याचे म्हणणे राहुल गांधींच्या पचनी न पडल्यामुळे त्यांनी आक्रमक भूमिका मांडत आपण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका का करतो हे स्पष्ट केले. यासंदर्भातील वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

नरेंद्र मोदींना आपण घाबरत नसून यापुढेही त्यांच्यावर टीका करणार असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट करताना पक्षातील काही नेते मात्र त्यांच्यावर टीका करण्यापासून दूरच राहतात असे म्हटले. यावर राहुल गांधींनी नाराजी व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लडाखपासून ते देशावरील आर्थिक संकटांपर्यंत सर्व गोष्टींसाठी घेण्यात आलेले निर्णय जबाबदार असताना त्यांना जाब विचारल्याशिवाय चर्चाच होऊ शकत नसल्याचे म्हटले. विशेष म्हणजे, याबैठकीत राहुल गांधी यांचे समर्थन करत मोदींविरोधात ते एकटेच लढत असल्याचे दिसत असल्याचे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत सहभागी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत बोलताना माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि झारखंडचे प्रभारी आरपीएन सिंग यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याने अनेक मुद्दे भरकटले जातात. यामुळे आपण नरेंद्र मोदींवर थेट टीका न करता त्यांच्या धोरणांवर टीका केली पाहिजे असे मत मांडले होते.

अनेकदा मत मांडताना पक्षातील इतर नेत्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधल्याने भाजप आणि मोदींना सहानुभूती मिळते आणि त्याचा ते फायदा उचलतात असे म्हटले आहे. त्याचबरोबर काँग्रेसला याचा तोटा होत असल्याचेही मत त्यांनी आहे. २०१९ च्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर पक्षाचा प्रचार मोदींवर जास्त केंद्रीत राहिला आणि इतर मुद्द्यांना पक्षाने मांडलेच नाही ही चर्चा चांगलीच रंगली होती.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांची बोलण्याची वेळ येताच आपण आरपीएन सिंग यांनी मांडलेल्या मुद्द्यावर बोलण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आपण टीका केली पाहिजे की त्यांच्या धोरणावंर यासंबंधी कार्यकारिणी, जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल. कारण पक्षाचा मी सेवक आहे. पण मला सांगायचे आहे की, नरेंद्र मोदींचे हे सर्व अपयश आहे. मग तो लडाखचा मुद्दा असो अथवा आर्थिक संकटाचा. यावेळी राहुल गांधी यांना उलट प्रश्न करत आपण कोणावर टीका केली पाहिजे, हे तुम्हीच सांगा अशी विचारणा करण्यात आली.

यावेळी राहुल गांधी यांच्या मताशी सहमत असल्याचे सांगत प्रियंका गांधी यांनीही राहुल गांधी आणि काही नेते वगळता इतर सर्व नेते नरेंद्र मोदींवर टीका करत नसल्याचे म्हटले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षातील अनेक नेत्यांनी यानंतर राहुल गांधींच्या मताशी सहमत असल्याचे सांगत नरेंद्र मोदींवरच टीका केली पाहिजे यावर एकमत केले.

Leave a Comment