
मुंबई – देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावाला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसारासाठी पंतप्रधानांना जबाबदार धरतानाच त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी देखील केली आहे. यादरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी ‘आम्हाला रोगाशी लढायचे आहे रोग्याशी नाही’ या कॉलर ट्यूनवरही आक्षेप नोंदवला आहे. आंबेडकर यांनी या कॉलर ट्यूनवर आक्षेप घेताना तीन महिने झाले कोरोनाचा हॅलो ट्यून वाजत आहे. प्रत्येक मोबाईलच्या माध्यमातून भीती दाखवली जात आहे. या मागे काय षडयंत्र आहे, त्याबाबत पंतप्रधानांनी सांगावे, असेही म्हटले आहे.
कोरोनाच्या प्रसाराला जबाबदार असलेल्या मोदींवर 302 अन्वये गुन्हा दाखल करा
यावेळी भारतीय जनता पक्षावरही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. सरकारने कोरोना व्हायरसचे निमित्त साधून सर्वसामान्य नागरिकांना ब्लॅकमेल केले आहे. तर देशात भारतीय जनता पक्षाने एकलकोंडी जीवनास सुरुवात केल्याचा आरोप केला. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, देशात या आधीही विविध आजारांनी अनेक लोक दगावले आहेत. याआधी क्षयरोगाने (टीबी) मोठ्या प्रमाणावर लोक दगावले होते. पण, तेव्हा लॉकडाऊन करण्यात आला नाही. मग आताच लॉकडाऊन का केले जात आहे? असा सवालही आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
अवघा देश लॉकडाऊनमध्ये आहे, त्याचबरोबर या लॉकडाऊनमुळे देशातील अनेक लोकांचे रोजगार बुडाले आहेत. लोक उपाशीपोटी झोपत आहेत, असे असताना सरकार फोनवर कॉलट्यून लावून लोकांना घाबरवत आहे. आज जवळपास तीन महिने होत आले तरीही ही रिंगटोन बदलली जात नाही. यामागे नेमके काय षडयंत्र आहे हे मोदींना सांगितल्याशिवाय कळणार नाही, असेही अॅड. प्रकाश आंबेडकर या वेळी म्हणाले.
सर्वसामान्य नागरिकांना सरकारने ब्लॅकमेल केल्यामुले नागरिकांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. 30 तारीख येण्याची वाट न पाहता नागरिकांनी सर्वसामान्य आयुष्य जगायला सुरुवात केली पाहीजे. आरोग्य विभागाने आम्हाला जगवले आहे, लॉकडाऊनने नसल्याचे सांगत लॉकडाऊने अनेकांचे आयुष्य उद्धवस्त केले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक लोक मनोरुग्ण झाल्याचा आरोपही आंबेडकर यांनी यावेळी केला.
