मुंबईतील डबेवाले कोरोनाच्या विळख्यात; पहिल्या डबेवाल्याच्या मृत्यूची नोंद


मुंबई – राज्यातील सर्वात मोठ्या हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतील डबेवाल्यांपर्यंत आता कोरोना पोहचला आहे. दरम्यान कोरोनामुळे मुंबईत पहिला डबेवाला दगावला आहे. कोरोनामुळे ३९ वर्षीय संतोष रामचंद्र जाधव यांचा मृत्यू झाला आहे. जाधव मालाड येथे वास्तव्यास होते. नायर रूग्णालयात बुधवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली आहे.

मुंबईतील डबेवाले आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गापासून दूर होते. पण संतोष जाधव यांच्या मृत्युमुळे डबेवाल्यांवरही कोरोनाचे संकट ओढावले आहे. मुंबईतील डबेवाल्यांना संतोष जाधव यांच्या मृत्युमुळे धक्का बसला आहे. संतोष जाधव यांच्या कुटुंबाच्या दुखात आम्ही सर्व डबेवाले सहभागी असल्याचे सुभाष तळेकर यांनी सांगितले आहे. संतोष जाधव यांच्या मागे आई -वडील, पत्नी व एक मुलगा आहे.

Leave a Comment