अक्षयच्या ९ वर्षांपूर्वीच्या ट्विटला आव्हाडांचा रिप्लाय; इंधन दरवाढीवरुन अक्षयला टोला


मुंबई – पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जूनपूर्वीच्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीमध्ये वाढ झाली नव्हती. इंधनाचा वापरही या काळातील लॉकडाउनमुळे खूप कमी झाला होता. मे महिन्याच्या अखेरीस दरवाढ नसल्याने शहरामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर सुमारे ७६ रुपये, तर डिझेलचा प्रतिलिटर दर ६५ रुपयांच्या जवळपास होता. पण गेल्या १९ दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचे सत्र कायम आहे. दरम्यान, दिल्लीत आजही पेट्रोलच्या दरात १६ पैशांची तर डिझेलच्या दरात १४ पैशांची वाढ करण्यात आली. यावरून अभिनेता अक्षय कुमार याला काही सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिमार्णमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावला आहे.


१६ मे २०११ रोजी अक्षय़ कुमारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून एक ट्विट केले होते. त्यात त्याने मी रात्री माझ्या घरीसुद्धा जाऊ शकलो नाही, कारण पुन्हा रॉकेटप्रमाणे इंधनाच्या किमती वाढण्याआधी संपूर्ण मुंबई पेट्रोलसाठी रांगा लावत होती, असे म्हटले होते. आव्हाड यांनी यावरून आता त्याच्यावर निशाणा साधला आहे. तू ट्विटरवर अॅक्टिव्ह आहेस का? तू गाड्या वापरणे बंद केलेस का? तू वृत्तपत्र वाचत नाहीस का? तुझ्या माहितीसाठी, पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याचे आव्हाड म्हणाले. या ट्विटसोबत अक्षय कुमारलाही त्यांनी ट्विटरवर टॅग केले आहे.

Leave a Comment