चीनविरोधी भावनेचा धसका; देशातील Xiaomi स्टोअर्समध्ये लागले ‘मेड इन इंडिया’चे लेबल


नवी दिल्ली – पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात चीनच्या सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशात चीनविरोधात वातावरण तयार झाले असून देशातील नागरिकांकडून चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्याचा परिणाम आता टेलिकॉम क्षेत्रातही दिसू लागला आहे. चीनविरोधी भावनेमुळे देशात स्मार्टफोन बाजारावर चिनी कंपन्यांच्या असलेल्या वर्चस्वावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे.

आपल्या देशात सध्या क्रमांक एक वर चीनी स्मार्टफोन Xiaomi चे मोबाईल आहेत. पण देशात असलेल्या चीनविरोधी भावनेचा फटका आपल्या ब्रँडला बसु नये म्हणून Xiaomi ने आपल्या स्टोअरसमोर मेड इन इंडियाचा लेबल लावण्यास सुरुवात केली आहे.

Xiaomi कंपनी आता भारतातील त्यांच्या स्टोअर्समध्ये मेड इन इंडियाचे पोस्टर्स लावत आहे. या संदर्भात इकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार आपल्या स्टोअर्समधील प्लोअर प्रमोटर्सना Xiaomiचा युनिफॉर्म न घालण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली-एनसीआर, मुंबई, चेन्नई, पटना, आग्रा आणि पुणे यासारख्या शहरांमधील Xiaomi स्टोअर्सला मेड इन इंडियाच्या लेबलने झाकण्यात आले आहे.

शाओमी, ओप्पो, व्हिवो, वन प्लस, रिअलमी, लेनोव्हा-मोटो आणि हुआई यांना ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने (AIMRA) या संदर्भात एक पत्र लिहिले आहे. विशेष म्हणजे चीनविरोधात बर्‍याच ठिकाणी निदर्शने करण्यात येत असून चिनी उत्पादने खरेदी न करण्याची मागणी केली जात आहे. यावेळी अनेक ठिकाणी तोडफोड व टाळेबंदीदेखील झाले आहे. या पत्रामध्ये किरकोळ विक्रेत्यांना चीनविरोधातील भावने दरम्यान होणारे शारीरिक नुकसान यापासून वाचवण्यासाठी त्यांच्या ब्रँडचा लोगो काही महिन्यांसाठी कव्हर करण्यास सांगितले गेले आहे.

Xiaomi इंडियाचे प्रमुख मनु कुमार जैन यांनी सीएनबीसी टीव्ही 18 ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की चीनविरोधातील भावनेचा Xiaomi च्या भारतामधील व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही. त्याचबरोबर सध्याच्या घडीला Xiaomi ची उत्पादन भारतात विकली जात आहेत. तसेच Xiaomi चे बहुतेक स्मार्टफोन भारतात बनविलेले आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या कंपनीच्या तुलनेत Xiaomi च्या उत्पादनांना भारतीयांची सर्वाधिक पंसती मिळत आहे.

Leave a Comment