या कारणामुळे जागतिक कराटे महासंघाने भारतीय संघाची मान्यता केली रद्द

जागतिक कराटे महासंघाने (डब्ल्यूकेएफ) मागील वर्षी निवडणुकी दरम्यान संस्थेच्या नियमांचे पालन न केल्याने भारतीय कराटे संघाची (केएआय) मान्यता अस्थायी स्वरूपात रद्द केली आहे. डब्ल्यूकेएफने सांगितले की, सर्व तपास केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. डब्ल्यूकेएफचे प्रमुख एंटोनियो एस्पिनोस यांनी केएआयचे अध्यक्ष हरिप्रसाद पटनायक यांना पत्र लिहून ही माहिती दिली आहे.

त्यांनी लिहिले की, भारतीय कराटे संघाच्या स्थितीची समीक्षा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाच्या तपासणीनंतर नियमांनुसार 22 जूनपासून त्वरित केएआयची मान्यता तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. जागतिक कराटे महासंघाने स्पष्ट केले की, भारतीय कराटे संघाच्या अंतर्गत कलहाबाबत ते खूश नाही. मागील वर्षी नियमांचे उल्लंघन करत निवडणूक पार पाडण्यात आली होती.

डब्ल्यूकेएफच्या अध्यक्षांनी लिहिले की, केएआयच्या सध्याच्या व्यवस्थापनाने आपल्या विश्वसनीयता गमावली आहे. सध्याचे व्यवस्थापन अपंग झाले आहे. व्यवस्थापनाच्या एका गटाचे नेतृत्व करणाऱ्या लिखा तारा यांचा दावा आहे की,  पदाधिकाऱ्यांची निवड बेकायदेशीररित्या करण्यात आली आहे. एक गट यावर नियंत्रणाबाबत म्हणत आहे, तर दुसरा गट भरत शर्मा यांना उपाध्यक्ष पद देण्यास सांगत आहे.

जागतिक कराटे महासंघाने केएआयला मान्यता रद्द करण्याच्या विरोधात 21 दिवसांच्या आत अपील करण्याचा पर्याय दिला आहे. केएआयची मान्यता रद्द करण्याच्या निर्णयाला मंजूरीसाठी डब्ल्यूकेएफ पुढील बैठकीत काँग्रेससमोर प्रस्ताव मांडेल. भारतीय ऑल्मिपिक महासंघाने देखील या वर्षी जानेवारीमध्ये केएआयची मान्यता रद्द केली होती.

Leave a Comment