1 जुलै पासून बदलत आहेत बँकांशी निगडीत ‘हे’ नियम


मुंबई – बँकांशी निगडीत अनेक नियम पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून बदलणार आहेत. पण त्या आधीच आपल्याला त्याची माहिती असणे गरजेचे आहे. नाही तर तुम्हाला या नियमांमुळे भुर्दंड भोगावा लागेल. 1 जुलैपासून एटीएममधून पैसे काढण्यासाठीचे नियमही आता बदलणार आहेत. ज्यामध्ये कर्जाचा हफ्ता भरण्यासाठी मुदतवाढ म्हणजेच लोन मोरेटोरियम (Loan Moretorium), बचत खात्यातील सरासरी शिल्लक काढून टाकणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. आता 30 जूनपासून हे सर्व नियम बँका बदलणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते नियम….

1 जुलैपासून पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) बचत खात्यावरील व्याज दरात 0.50 टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार आता बँकेच्या बचत खात्यास वार्षिक जास्तीत जास्त 3.25 टक्के व्याज मिळेल. पीएनबीच्या बचत खात्यात 50 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक रकमेवर वार्षिक 3% आणि 50 लाखांपेक्षा जास्त रकमेवर वार्षिक 3.25 टक्के व्याज दिले जाईल. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँकेनेही यापूर्वी आपल्या बचतीवरील व्याज दरातील कपातीची घोषणा केली होती.

एटीएममधून पैसे काढण्याचे नियम लॉकडाऊन आणि कोरोनामुळे बदलले जात आहेत, आता जे तुमच्या खिशावरील भार वाढवतील. एटीएममधून पैसे काढणे आता 1 जुलैपासून तुम्हाला महागात पडणार आहे. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या काळात अर्थ मंत्रालयाने एटीएममधून रोख रक्कम काढण्यासाठी सर्व व्यवहार शुल्क मागे घेतले होते. एटीएम व्यवहार शुल्क चार्जेस तीन महिन्यांपर्यंत कमी करून सरकारने कोरोना संकटाच्या काळात लोकांना मोठा दिलासा दिला होता. पण ही सूट केवळ तीन महिन्यांसाठीच देण्यात आली होती, जी 30 जून 2020 रोजी संपणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोरोना काळात जाहीर केले होते की कोणत्याही बँकेच्या बचत खात्यात सरासरी किमान शिल्लक ठेवणे जरुरीचे राहणार नाही. हा आदेश एप्रिल ते जून या काळासाठी लागू करण्यात आलेला होता. आपल्या खात्यात अशा परिस्थितीत किमान शिल्लक नसतानाही लोकांना कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागत नव्हता. पण आता या निर्णयाची मुदत ही 30 जून रोजी संपुष्टात येणार असून त्याचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे.

Leave a Comment