राष्ट्रवादीशी शरद पोंक्षेंचा काडीमात्र सबंध नव्हता आणि कधीच नसेल


मुंबई – राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने ३० लाखांपेक्षा अधिक मदत कोरोनामुळे अनेक समस्यांना तोंड देणाऱ्या बॅकस्टेज कलाकारांना करण्यात आली असून नाट्य परिषदेचे पदाधिकारी शरद पोंक्षे यांनी मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासोबत या मदतीबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट दिली. पण त्यांच्या या भेटीनंतर अनेक उलटसुलट चर्चा सुरू असून, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकाही होऊ लागली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खुलासा केला आहे.


सोशल मीडियावर शरद पोंक्षेच्या भेटीनंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर ट्विट करून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर खुलासा केला आहे. महात्मा गांधींची हत्या ही भारतातील पहिली दहशतवादी घटना होती. गांधींच्या हत्येचे समर्थन करणारे विचार, हे देखील निश्चितच विकृत विचार असल्याची माझी ठाम धारणा आहे. बॅकस्टेज कलाकारांना कोरोना काळात राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने तीस लाखांहून अधिक रकमेची आर्थिक मदत करण्यात आली. याबद्दल आभार मानण्यासाठी शरद पोंक्षे हे नाट्य परिषद पदाधिकारी, नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासोबत पक्ष कार्यालयात आले होते. यापलीकडे शरद पोंक्षे यांचा आणि पक्षाचा काडीमात्र संबंध नव्हता आणि कधीच नसेल, असे जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. गांधीवादी विचारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष आहे. गांधीवादी लोकांनी केलेल्या मदतीबद्दल गांधी हत्येचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीवर आभार मानण्याची वेळ यावी, हाच महात्मा गांधींच्या विचारांचा विजय असल्याचेही जयंत पाटील यांनी ट्विट करून म्हटले आहे.


दरम्यान याविषयी राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून भूमिका मांडली आहे. विकृत शरद पोंक्षे राष्ट्रवादी पक्षाच्या व्यासीठावर वर येणे हे क्लेशकारक दुर्दैवी होते. पण जयंत पाटील यांच्या कानी पुरोगामी कार्यकर्त्यांचा आक्रोश पडताच, त्यांनी पक्षाची भूमिका अत्यंत तत्परतेने स्पष्ट केली. आभार, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

Leave a Comment