चीनच्या नाकावर टिचून भारताला ‘ब्रह्मास्त्र’ देणार रशिया


मॉस्को – भारत आणि चीनदरम्यान पूर्व लडाखमधील गलवाण येथे झालेल्या चकमकीनंतर सीमेवर तणावाचे वातावरण आहे. याचदरम्यान, लवकरच अत्याधुनिक एअर डिफेन्स मिसाइल सिस्टम S-400 भारताला देण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. सध्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे रशियाच्या दौऱ्यावर असून यादरम्यान हे ब्रह्मास्त्र लवकरच भारताला देण्याचे आश्वासन रशियाचे उपपंतप्रधान युरी इवानोव्हिक यांनी दिले आहे. तत्पूर्वी भारताला शस्त्रास्त्र न पुरवण्याची विनंती चीनचे सरकारी वृत्तपत्र पीपल्स डेलीने रशियाला केली होती.

दरम्यान राजनाथ सिंह यांनी बैठकीनंतर भारत आणि रशियादरम्यान विशेष सहकार्य असून त्याचबरोबर लवकरच भारतासोबतचा करार पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिल्याची माहिती दिली. माझी रशियाच्या उपपंतप्रधानांशी चर्चा झाली आहे आणि बैठकीतही सकारात्मक चर्चा झाली. द्विपक्षीय संबंध कोरोनासारख्या संकटानंतरही दृढच आहेत. जे करार करण्यात आले आहेत, ते कायम ठेवण्यात येतील. त्याचबरोबर बऱ्याच बाबींमध्ये ही कामे लवकरच पूर्ण केली जातील, असे सांगितल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे.

तत्पूर्वी रशियाने भारताला शस्त्रास्त्रे देऊ नये, असे मत चीन सरकारचे मुखपत्र पीपल्स डेलीने व्यक्त केले होते. यासंदर्भात तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रशियाने या संवेदनशील काळात भारताला शस्त्रास्त्रे देऊ नये. आशियातील हे दोन्ही शक्तीशाली देश रशियाचे जवळचे रणनितीक भागीदार असल्याचे पीपल्स डेली या वर्तमानपत्राने फेसबुकवरील सोसायटी फॉर ओरियंटल स्टडीज ऑफ रशिया या ग्रुपवर लिहिले होते.

Leave a Comment