नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण, इतर खेळाडूंची मागितली माफी - Majha Paper

नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण, इतर खेळाडूंची मागितली माफी

जगातील नंबर वन टेनिसपटू नोवाक जोकोविच आणि त्याची पत्नी जेलेना यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ग्रिगोर डिमिट्री, बोर्ना कोरिक आणि विक्टोर ट्रोईकी हे खेळाडू देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय फिटनेस ट्रेनर मार्को पैंची आणि डिमिट्रीचे कोच ख्रिश्चिन ग्रोह यांनी देखील कोरोनाची लागण झाली आहे. जोकोविचने आपल्या भावासोबत मिळून सर्बिया आणि क्रोएशिया येथे एंड्रिया टूर स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सहभागी झाल्याने या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे.

जोकोविचने आता या स्पर्धेचे आयोजन करताना घाई केल्याचे म्हणत कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या सर्वांची माफी मागितली आहे. त्याने सोशल मीडियावर लिहिले की, या स्पर्धेमुळे नुकसान झाल्याने मी सर्वांची माफी मागतो. मागील एका महिन्यात ऑर्गनायझेर आणि मी जे केले ते सर्व निर्मळ मनाने आणि चांगल्या भावनेनेच केले. आम्हाला विश्वास होतो की या दरम्यान सर्व दिशानिर्देश पाळले जातील व सर्व लोक यामुळे एकत्र येतील. मात्र आम्ही चुकीचे होतो व खूपच लवकर याचे आयोजन करण्यात आले.

नोवाक आणि त्याची पत्नी जेलेना यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर ही स्पर्धा रद्द करण्यात आली. या स्पर्धेत सहभागी झाला असेल तर कृपया चाचणी करा व सोशल डिस्टेंसिंगचे पालन करा, असेही जोकोविचने म्हटले आहे. एंड्रिया टूरचे आयोजन करण्याचा उद्देश महामारीमुळे नुकसान झालेल्या लोकांसाठी निधी उभा करणे हा होता. मात्र यावेळी कोणतेही सोशल डिस्टेंसिंगचे पालन झाले नाही. जोकोविच व इतर खेळाडू नेहमीप्रमाणेच एकमेकांना अलिंगन देत होते. जोकोविचमध्ये लक्षण अद्याप दिसलेली नाहीत, मात्र तो 14 दिवस सेल्फ-आयसोलेशनमध्ये राहणार आहे.

Leave a Comment